Home शैक्षणिक केंद्रप्रमुख राम निकम यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार जाहीर

केंद्रप्रमुख राम निकम यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार जाहीर

केंद्रप्रमुख राम निकम यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार जाहीर

जामखेड प्रतिनिधी

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ५ सप्टेंबर रोजी दिला जाणारा जिल्हा परिषदेचा ‘आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार’ पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम यांना जाहीर झाला आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

श्री. राम निकम हे १२ सप्टेंबर १९९१ रोजी जि. प. प्राथमिक शाळा सावरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मोहा, फक्राबाद आणि देवदैठण येथे पदवीधर शिक्षक म्हणून तर खर्डा येथे ग्रेड मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. पदवीधर शिक्षक व ग्रेड मुख्याध्यापक या पदांवरील सेवेनंतर २०२४ मध्ये त्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली. आजवर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली आहे. त्यांनी पाटोदा केंद्रासोबतच नान्नज व जामखेड या केंद्रांचाही अतिरिक्त पदभार यशस्वीपणे सांभाळला.

केंद्रप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी पाटोदा केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १६ शाळा आणि ४ खासगी माध्यमिक विद्यालयांचे प्रशासकीय कामकाज उत्कृष्टपणे हाताळले. सर्वांना विश्वासात घेऊन शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर दिला. त्यांच्या कार्यकाळात कुसडगाव व रत्नापूर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले, तर कुसडगाव शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. याशिवाय सर्व शाळांमध्ये परसबाग निर्मिती, SQAAF स्वयं मूल्यमापन, विद्या समीक्षा केंद्रावरील दैनंदिन उपस्थिती आणि शिक्षण परिषदांचे नेटके आयोजन यांत केंद्राचा सक्रिय सहभाग राहिला.

श्री. निकम यांना यापूर्वी २००९ मध्ये जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रदीर्घ व उत्कृष्ट प्रशासकीय सेवेची दखल घेत जिल्हा परिषदेने त्यांना ‘आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार’ जाहीर केला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित दादा पवार, बीडचे माजी आमदार सुनील धांडे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी,  गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख व तालुक्यातील शिक्षकवृंदाने राम निकम यांचे अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!