शाळेत रंगली लोकशाहीची निवडणूक! ‘नवीन मराठी प्राथमिक शाळेत’ मुख्यमंत्री पदासाठी उत्साहात मतदान

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी या उद्देशाने, नवीन मराठी (लोकमान्य) प्राथमिक शाळेत आज ‘शाळेचा मुख्यमंत्री’ निवडण्यासाठी अत्यंत उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात मतदान पार पडले. गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या अनोख्या निवडणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.या निवडणुकीत प्रेम नितिन जाधव या विद्यार्थ्याने सर्वात जास्त 101 मतदान घेतले त्यामुळे त्याची शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

या मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी एकूण २० उमेदवार विविध चिन्हांसह रिंगणात उतरले होते. प्रचार संपल्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. शाळेतील २० विद्यार्थी प्रतिनिधींनी अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपले मत नोंदवले. आधुनिक काळातील ईव्हीएम ऐवजी, विद्यार्थ्यांना मूळ निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेता यावा यासाठी बॅलेट पेपर (मतपत्रिका) द्वारे हे मतदान घेण्यात आले.

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांनीच हाताळली. मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी म्हणून स्वतः विद्यार्थ्यांनीच काम पाहिले. तर, मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखली जावी यासाठी शाळेच्या आर.एस.पी.’ (RSP) पथकातील विद्यार्थ्यांनी सुरक्षा कर्मचारी म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. शाळेतील एकूण 331 मतदारांपैकी 319 विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. “विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव देऊन त्यांच्यात लोकशाहीची मूल्ये रुजवणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे भविष्यात हे विद्यार्थी एक जबाबदार नागरिक बनतील.” असे मत शाळेचे सचिव राजेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत प्रेम नितिन जाधव या विद्यार्थ्याने सर्वात जास्त 101 मतदान घेतले त्यामुळे त्याची शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

या उपक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी संतोष घोलप सर, हजारे सर, टेमकर सर आणि बांगर सर यांनी विशेष परिश्रम घेतले. मतदान सुरू असताना ‘लोकमान्य तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे’ सचिव राजेंद्र देशपांडे यांनी मतदान केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या नियोजनाचे भरभरून कौतुक केले व संपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आता संपूर्ण शाळेचे लक्ष ‘कोण होणार शाळेचा मुख्यमंत्री?’ याकडे आणि आगामी मतमोजणीकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here