दिघोळ फाटा येथे स्कुल बस व चारचाकी वाहनाचा अपघात; मोठा अनर्थ टळला

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील दिघोळ फाटा येथे गुरुवारी (दि. ९ जुलै) सायंकाळी स्कुल बस आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात स्कुल बसमधील २३ विद्यार्थी बालंबाल बचावले असून काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुल बस (क्र. एमएच १४ सीडब्ल्यू ३५०५) ही शाळा सुटल्यानंतर दिघोळ व जातेगाव परिसरातील २३ विद्यार्थ्यांना घेऊन जातेगावकडे निघाली होती. त्याचवेळी जातेगाव येथून खर्ड्याकडे येणारी चारचाकी कार (क्र. एमएच १२ एफपी ९११९) दिघोळ फाटा परिसरात आली. सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर स्कुल बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन आडवी पडली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण २३ विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढले. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नाही.


यावेळी नागरिकांनी तत्परता दाखवत स्कुल बस मध्ये अडकलेले विद्यार्थी बाहेर काढले. नागरिकांनी इंडीका कार ड्रायवरला चांगलाच चोप दिला आसल्याची माहीती समोर येत आहे. दरम्यान आलेल्या रूग्णवाहिकेतुन जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठविले .दिघोळ जातेगाव फाटा परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मोठी मदत केली. यावेळी खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट दिली .घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना पहाण्याची घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून २३ विद्यार्थ्यांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here