दिल्लीतील जंतर-मंतर लाठीमाराचे पडसाद; जामखेड कडकडीत बंद

विद्यार्थ्यांना न्याय द्या, दोषींवर कठोर कारवाई करा : ॲड. डॉ. अरुण जाधव

जामखेड प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीची शोकांतिका असून न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे नेमके कोण होते, त्यांच्या हातात दांडके कसे आले, वाहनांमध्ये दगड कोठून आणण्यात आले, याची सखोल चौकशी करून संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रहार जनशक्ती पक्ष, काँग्रेस, आदिवासी संघटना, लोकाधिकार आंदोलन, मुस्लिम पंच कमिटी आदी विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला.

व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी करण्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे दिवसभर जामखेड शहरातील व्यवहार ठप्प राहिले. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर पोहोचला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा निषेध व्यक्त केला. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली मते मांडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनाच्या समारोपावेळी दिल्लीतील आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र कोठारी, मुस्लिम पंच कमिटीचे अझहरभाई काझी, संभाजी ब्रिगेडचे व सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, शिवसेनेचे ॲड. मयुर डोके, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युम सुभेदार, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, आदिवासी नेते प्रकाश काळे, लोकाधिकार आंदोलनाचे बापूसाहेब ओव्होळ, इस्माईल सय्यद, विकी सदाफुले, प्रा. लक्ष्मण ढेपे, रमेश आजबे, माजीद कुरेशी, रवि शेळके, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, मुकुंद घायतडक, रंजित मेघडंबर, नगरसेविका संगीता भालेराव, नगरसेवक वसिम सय्यद, नगरसेवक प्रशांत राळेभात, प्रा. कुंडल राळेभात, ॲड. हर्षल डोके, जुबेर शेख, सरपंच बाळासाहेब खैरे, बापूसाहेब कार्ले, मच्छिंद्र जाधव, सचिन शिंदे, गणेश हगवणे, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, हरिभाऊ आजबे, प्रा. धनंजय भोसले, स्वप्निल खाडे, रजनी औटी, सुरज भालेराव, ऋषिकेश गायकवाड, सागर कांबळे, विकी पिंपळे, विशाल जाधव, पिंटू जाधव, नितीन जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

“जालियनवाला बागची आठवण करून देणारी घटना”
दिल्लीतील जंतर-मंतर येथे न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीमार हा इंग्रजांच्या काळातील जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून न्याय देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here