


जि.प. प्राथमिक तपनेश्वर शाळेस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
शिक्षकांच्या शासकीय ड्युटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार यांनी जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असून, नगर परिषदेने शाळेला सुमारे दोन हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध करून द्यावी. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सुविधाही द्यावी.
याशिवाय शाळेच्या संरक्षण भिंतीचे मंजूर झालेले काम जागेच्या वादामुळे अपूर्ण असून, संबंधित अडचण दूर करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण भिंत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात आठवड्यातून किमान दोन वेळा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संरक्षण भिंत नसल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांसह जनावरांचा वावर होत असून त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने नगर परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
चौकट
—————
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा; पालकांची प्रशासनाकडे मागणी
——————-
सध्या ३० जून ते २९ जुलै या कालावधीत शाळेतील शिक्षक विविध शासकीय कामांवर ऑन ड्युटी आहेत. आमच्या शाळेतील आठ शिक्षकांपैकी चार शिक्षक मतदार नोंदणी अधिकारी (BLO) म्हणून कार्यरत असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यामुळे इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे सराव वर्ग बंद ठेवावे लागले आहेत. इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाचेही नुकसान होत आहे. ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) चे कामकाज सुरू राहणार असल्याने ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्गशिक्षकाला सलग चार दिवस प्रशिक्षणासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी पालकांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.









