


जामखेड नगरपरिषदेतील चुकीच्या कर आकारणीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
सात दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी, स्वच्छता कर, शालेय कर व दवाखाना कर आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी झाल्याचा आरोप करत आ.रोहित (दादा) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेकडून मालमत्तांचे सर्वेक्षण करून नवीन करआकारणी करण्यात आली असली, तरी संबंधित एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक गंभीर चुका झाल्याने चुकीच्या मोजमापाच्या आधारे नागरिकांवर अवास्तव घरपट्टी, स्वच्छता कर, शालेय कर व दवाखाना कराचा आर्थिक बोजा टाकण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याप्रकरणी चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात आलेली वाढीव घरपट्टी व करआकारणी तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे करआकारणी लागू करावी, संबंधित एजन्सीची नियुक्ती रद्द करून सक्षम व नवीन एजन्सीमार्फत संपूर्ण नगरपरिषद हद्दीचे फेरसर्वेक्षण करावे तसेच फेरसर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच नियमानुसार नवीन करआकारणी लागू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या मागण्यांवर सात दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन, रास्ता रोको तसेच इतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, नगरसेवक राजेंद्र गोरे, इस्माईल सय्यद, वसीम शेख, पदाधिकारी प्रकाश काळे, प्रा.लक्ष्मण ढेपे, नासीर चाचू सय्यद, हरिभाऊ आजबे, प्रा.कुंडल राळेभात, डॉ. नरसाळे, धनराज राजगुरू, बजरंग डुचे, दादा महाडिक, सचिन शिंदे, अनिल अडाले, इम्रान तांबोळी, अक्षय पोकळे, सोहेल सय्यद, इब्राहिम सय्यद, भाऊसाहेब केवडे आदी उपस्थित होते.







