


नागपंचमी निमित्त जामखेडमध्ये रंगणार कुस्त्यांचा थरार; सलग २४ व्या वर्षी भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान
जामखेड प्रतिनिधी
जामखेडची नागपंचमी यात्रा ही महाराष्ट्रासह राज्यभरात प्रसिद्ध असून, या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक व कुस्तीशौकीन आवर्जून उपस्थित राहतात. गेल्या काही वर्षांपासून कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानामुळे जामखेडच्या नागपंचमी यात्रेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यंदाही या प्रतिष्ठानच्या वतीने सलग २४ व्या वर्षी भव्य कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा गौरव युवराजभाऊ काशीद व उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. अजय काशीद यांच्या नियोजनातून हे मैदान आयोजित करण्यात आले आहे. विविध राज्यांमधून नामांकित पैलवान या मैदानात सहभागी होत असल्याने जामखेडच्या कुस्ती मैदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही या मैदानाला दरवर्षी उपस्थिती असते.

नागपंचमी यात्रेनिमित्त दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे. यापूर्वी दुपारी १२ वाजता जामखेड येथील शनी मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण मराठा गौरव युवराजभाऊ काशीद, मराठी भाषीय संघ अध्यक्ष, मध्यप्रदेश यांची उपस्थिती असणार आहे.

नामांकित पैलवानांमध्ये रंगणाऱ्या चुरशीच्या लढतींमध्ये मैदानातील पहिली मानाची कुस्ती पै. रविराज चव्हाण, आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध महारुद्र कालेज, कुर्डुवाडी यांच्यात होणार आहे. दुसरी कुस्ती पै. मोईन पटेल, कुर्डुवाडी विरुद्ध मुसा पहलवान, महापौर केसरी इंदोर यांच्यात रंगणार आहे. तिसरी कुस्ती रोहित दैया, शाहू कुस्ती केंद्र विरुद्ध पै. शाहरुख खान, पुणे यांच्यात होणार आहे. चौथी कुस्ती सौरभ गाडे, पाटोदा विरुद्ध तात्या घुले, कोल्हापूर यांच्यात होणार आहे. तर पाचवी कुस्ती पृथ्वीराज वनवे, शंभूराजे कुस्ती संकुल, जामखेड विरुद्ध अमोल दिंडे चाऊस, आष्टी यांच्यात होणार आहे.
यंदाच्या मैदानाचे नियोजन करताना निश्चित करण्यात आलेल्या कुस्त्यांनाच प्राधान्य देण्यात आले असून, त्याव्यतिरिक्त ऐनवेळी कोणतीही अतिरिक्त कुस्ती लावली जाणार नसल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील पैलवानांसोबतच बाहेरील राज्यांतील नामांकित पैलवानही येथे सहभागी होतात. यापूर्वी अनेक नामांकित कुस्तीपटूंनी जामखेडच्या या मैदानात आपली कुस्तीची कला सादर केली आहे.

त्यामुळे दरवर्षी या मैदानाकडे कुस्तीप्रेमींचे विशेष लक्ष असते. जामखेडसारख्या ग्रामीण भागात कुस्तीपटू व तरुणांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम ॲड. अजय काशीद यांच्या माध्यमातून केले जात आहे. आज अनेक तरुण विविध व्यसनांच्या आहारी जात असताना त्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. कुस्तीच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, मेहनत आणि सकारात्मक विचारांची दिशा मिळते.
कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुस्ती मैदानासोबतच विविध सामाजिक उपक्रमही वेळोवेळी राबविले जातात. त्यामुळे सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांमुळे ॲड. अजय काशीद यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने पैलवान, कुस्तीपटू आणि कुस्तीशौकीन या मैदानाला उपस्थित राहतात. यंदाही जामखेडसह परिसरातील तसेच जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्तीचा थरार अनुभवावा, असे आवाहन ॲड. अजय काशीद व काशीद परिवार तसेच अजय काशीद मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.







