Home ताज्या बातम्या एस टी बससेवा विस्कळीत, जवळा ग्रामस्थांचे १८ जून रोजी रास्ता रोको आंदोलन.

एस टी बससेवा विस्कळीत, जवळा ग्रामस्थांचे १८ जून रोजी रास्ता रोको आंदोलन.

एस टी बससेवा विस्कळीत, जवळा ग्रामस्थांचे १८ जून रोजी रास्ता रोको आंदोलन.

जामखेड आणि करमाळा आगार व्यवस्थापन प्रवाशांना वेठीस धरत असल्याच्या ग्रामस्थांचा आरोप.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड – करमाळा राज्यमार्गावरील अनियमीत एस टी बस सेवेबाबत व जामखेड आणि करमाळा आगार व्यवस्थापन प्रवाशांना वेठीला धरत असल्याच्या प्रश्री जवळा ग्रामस्थांतर्फे गुरुवारी (ता,१८) रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत जवळा ग्रामस्थांतर्फे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार रोहित पवार, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, जिल्ह्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, जामखेडचे आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप, करमाळा आगार व्यवस्थापक श्री कानडे , अकलुजचे आगार व्यवस्थापक, तहसीलदार धनंजय बांगर, पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन दिले आहे. दरम्यान युवक कार्यकर्ते संकेत हजारे, सुरज भोंडवे, विनोद शिंदे, रोहन हजारे, अनिकेत हजारे, रोहित हजारे, केतन हजारे यांनी समक्ष जावुन निवेदन दिले आहे.

या निवैदनात म्हटले आहे की, जामखेड आणि करमाळा हे दोन्ही एस टी आगार प्रवाशांना वेठीला धरत आहेत. सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत यादरम्यान जवळा येथून करमाळयाला जाण्यासाठी एकही बस नसते. याबाबत वारंवार सांगुनही यावेळेत गाडी सूरू झालेली नाही. परिणामी यादरम्यान एखादी गाडी आलीच तर, येणाऱ्या गाडीत प्रवाशी संख्या क्षमतेपेक्षा खूप मोठी असल्याने बस मध्ये बसायलाही जागा मिळत नाही. साहजिकच प्रवाशांचे खूप हाल होतात. ३-३ तास बसची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येते.

याबाबत वारंवार सांगुनही काहीही सुधारणा झालेली नाही. दरम्यान चार दिवसापुर्वी करमाळा येथे नियमीत कामाला जाणाऱ्या एका प्रवाशाबरोबर गर्दी असलेल्या गाडीत घेत नाहीत. म्हणून चालक वाहकांबरोबर भांडण झाले. याचा कसूर काढून, जामखेड आणि करमाळा आगाराच्या बस जवळा बसस्थानक – बाळेश्वर-खंडोबा मार्गे न नेता काही बस जवळा बसस्थानकावरून, तर काही बस बाहेरून फाट्यावरून जात आहेत. यामुळे गेल्या आठ दिवसापासून प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. याबाबत दोन्ही आगाराच्या बस पुर्ववत जवळा गावातून बाळेश्वर – खंडोबा मार्गे नेण्याची मागणी केली आहे.

जामखेड – करमाळा राज्यमार्गावर जामखेड आगाराच्या अपुऱ्या बस फेऱ्या असल्याने, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत गेली तीन वर्षापासून वारंवार सांगूनही यामध्ये काहीही सूधारणा झालेली नाही. याप्रश्री जामखेड आगारामार्फत जामखेड बसस्थानकावरून सरासरी एक तासाला करमाळयाला जाण्यासाठी बस सोडण्यात यावी. जामखेड – करमाळा राज्यमार्गावर ३-३ तास बस नसतात. मात्र बहुतांशवेळा ४-५ बस एकामागोमाग जातात. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करमाळयाला जाण्यासाठी बस नसते. त्यानंतर पुढील एक तासात साधारण ४-५ बस एकामागोमाग येतात.

जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आळजापुर आणि बिटरगाव (ता.करमाळा ) येथील साधारण ५० हून अधिक विद्यार्थी बसने येत असतात. दुपारी सव्वाचार वाजता विद्यालय सुटल्यानंतर मात्र सायंकाळी साडेसात पर्यंत बस येत नसल्याने या विद्यार्थ्यांना तब्बल ३ -३ तास जवळा बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. यामध्ये या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातानाच, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वारंवार सांगुनही यामध्ये सुधारणा झालेली नाही. यासाठी दुपारी ४ वाजता जामखेड बसस्थानकावरून करमाळयाला जाण्यासाठी बस सोडावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना जवळा येथुन साधारण साडेचार वाजेपर्यंत बस मिळेल.

गेली ५० वर्षाहूनही अधिक काळापासून चालु असलेली रात्री साडेआठ वाजताची जामखेड- जवळा मुक्कामी बस कधी येते तर कधी येत नाही. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, ही बस नियमीत सोडावी. ५० वर्षापासून चालु असलेली सकाळी सव्वासहा वाजताची जवळा – अहिल्यानगर बस कधी चालु तर कधी बंद असते. यामध्ये प्रवाशांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बस नियमीत सूरू ठेवावी व सदरची बस पुर्वीप्रमाणे जवळा -हाळगाव -पिंपरखेड -अरणगाव -माहिजळगाव मार्गे अहिल्यानगर अशी पुर्ववत नियमीत बस चालवावी.

यापुर्वी चालु असलेली जामखेड- जवळा – करमाळा मार्गे पुणे बस नियमीत सूरू करावी. त्याचबरोबर यामार्गे दिवसभरात दोन बस पुण्याला सोडण्यात याव्यात. जामखेड- करमाळा मार्गावर पंढरपुरला जाण्यासाठी कोणत्याही आगाराची बस नसल्याने, पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. यापुवी पाथर्डी आणि शेवगाव आगाराच्या दोन बस या मार्गावरून पंढरपुरला जात होत्या. मात्र सध्या या दोन्ही बस बंद आहेत. यापुर्वी जामखेड आगारामार्फत जामखेड- पंढरपुर बस सूरू होती. मात्र ही बस अनेक वर्षापासून बंद आहे. या तीन्ही आगाराच्या पंढरपुरला जाणाऱ्या बस पुर्ववत सूरू करण्यात याव्यात. जामखेड-करमाळा राज्यमार्गावरील लांबच्या पल्ल्याची एकमेव अकलूज डेपोची अकलूज – संभाजीनगर बस जवळा फाट्यावरून अधूनमधून नेली जाते. सदरची बस जवळा बसस्थानकावरून नियमीत नेण्यात यावी. यासंदर्भात अकलूज आगाराला सुचना देण्यात याव्यात. जामखेड आणि करमाळा आगाराचे वेळापत्रक एकत्रित करून, जामखेड आणि करमाळा बसस्थानकावरुन सरासरी अर्ध्या तासाला या मार्गावर बस सोडण्यात यावी. याप्रश्री तातडीने दखल घेवुन, प्रश्र मार्गी लावावा, अन्यथा १८ जून रोजी सकाळी १० वाजता जवळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जवळा ग्रामस्थांनी दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!