


बांधकाम चालू असलेल्या पुलाच्या खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव
मोटारसायकल खड्ड्यात कोसळली; जामखेडच्या तरुणाचा जागीच मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड–माहीजळगाव महामार्गावरील भातोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथील नदीवरील सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील एका मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अंधारात सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड–माहीजळगाव महामार्गावरील भातोडी फाटा ते हरिनारायण आष्टा या रस्त्याचे काम सुरू असून भातोडी गावाजवळ नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. मयत बालाजी विलास पागिरे, रा. मतेवाडी, हल्ली मुक्काम पोकळे वस्ती, जामखेड हा तरुण पहाटे हरिनारायण आष्टा येथून मोटारसायकलवरून जामखेडकडे येत होता. भातोडी येथील अपूर्ण पुलाजवळ पोहोचताच अंधारामुळे पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याची मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पहाटे ग्रामस्थांची ये-जा सुरू झाल्यानंतर पुलाखाली मोटारसायकलसह तरुण पडल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृत तरुणाच्या मोबाईलवर जामखेड येथील अवधूत हॉटेलच्या मालकाचा फोन आला. ग्रामस्थांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हॉटेल मालक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला तसेच आष्टी पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तरुणाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून आष्टी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

मयत बालाजी पागिरे हा जामखेड येथील अवधूत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू असलेल्या पुलाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात इशारा फलक, बॅरिकेड्स व प्रकाशव्यवस्था होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून या दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









