

नान्नज येथे ग्रामसभा संपन्न; एसटी बसस्थानकासाठी जागा देण्यावर ग्रामस्थांचे एकमत
जामखेड प्रतिनिधी
नान्नज येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभा किरकोळ तक्रारी व मागण्या वगळता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ग्रामपंचायत अधिकारी गोरख पवार, प्रशासक श्रीमती प्रभावती मोहोळकर व ग्रामसभेचे अध्यक्ष अतुल मोहोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत गावातील विविध विकासकामे, शासकीय योजना, पाणीप्रश्न तसेच एसटी बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

ग्रामसभेच्या सुरुवातीला नान्नज ग्रामस्थांसाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांची माहिती रोजगार सेवक हनुमंत पवार यांनी ग्रामस्थांना देण्यात आली. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे ग्रामपंचायत अधिकारी गोरख पवार यांनी सांगितले.

नान्नज गावासाठी एसटी बसस्थानकाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्याचा विषय ग्रामसभेत मांडण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देत एसटी बसस्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे भविष्यात नान्नज गावाला स्वतंत्र एसटी बसस्थानक मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, नान्नज गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याची बाब ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडली. गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची पुनश्च सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नान्नज गावाला किमान तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी संतोष मोहळकर व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
गावातील अनधिकृत व अवैध धंद्यांना ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा परवाना अथवा ठराव देण्यात येऊ नये, अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली. गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक वातावरण अबाधित राहण्यासाठी अशा प्रकारच्या अनधिकृत व्यवसायांना प्रोत्साहन मिळू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

नान्नज गावातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असे ग्रामपंचायत अधिकारी गोरख पवार यांनी सांगितले. घरकुल योजना, गाय-गोठा योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोजगार सेवक हनुमंत पवार यांनी नवीन आलेल्या रोजगार हमी योजनेच्या नियमांचे ग्रामसभेत वाचन करून उपस्थित नागरिकांना त्याबाबत माहिती दिली. रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या कामांची व योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यापुढे शासन स्तरावरून येणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना वेळोवेळी देऊन आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे हनुमंत पवार यांनी सांगितले.
ग्रामसभेत गावातील विविध विकासकामे, नागरिकांच्या अडचणी, मूलभूत सुविधा आणि शासनाच्या योजनांचा लाभ यावर चर्चा करण्यात आली. किरकोळ तक्रारी व मागण्या वगळता ग्रामसभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, माजी सरपंच सुनील हजारे, सरपंच श्रीमती प्रभावती मोहोळकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहोळकर, माजी सरपंच संतोष पवार, माजी उपसरपंच दादाराजे भोसले, अध्यक्ष भरत मोहोळकर, नागनाथ कोळपकर, भाऊसाहेब कोळपकर, उपसरपंच संजय साठे, सतीश साळवे, दिलीप मोहोळकर, इनूस पठाण, फकिरभाई शेख, बलभीम किंबहुने, फारुख कुरेशी, अस्लम शेख, युवा नेते अजय राजपूत, भुजंग दळवी, अमर चाऊस, किशोर साठे, महेश दळवी, विजय साठे, भिवा साठे, आप्पा दळवी यांच्यासह नान्नज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट – १)
ग्रामसभेला जे काही शासकीय अधिकारी आले नाहीत यांचा वर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक मुखी ठराव घेऊन मजुर करण्यात आला आहे
चौकट -२)
गावातील कोणत्याही महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त वर्गणी हि सक्तीची करुन घेऊ नये








