Home शैक्षणिक “काळ बदलतोय, शिक्षकांनीही बदलले पाहिजे!” – शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे

“काळ बदलतोय, शिक्षकांनीही बदलले पाहिजे!” – शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे

ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात, सादिक शेख यांचा सेवापूर्तीबद्दल सपत्नीक सन्मान

जामखेड प्रतिनिधी

ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी शिक्षकांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले. “शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून एक ध्यास आहे.

समाजात शिक्षकाचे स्थान आजही आबाधित असून, राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पूजा कोल्हे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत “शिक्षकी पेशा हा केवळ व्यवसाय नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचा ध्यास आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमास शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, संचालक डॉ. प्रताप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक सुदाम वराट, पत्रकार नासीर पठाण, सर्फराज पठाण, सतीश डुचे, गायवळ सर, एकदिवसीय प्राचार्य सुजित टेकाळे, उपप्राचार्य गायत्री जाधव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध शिक्षकांच्या भूमिका साकारत एक दिवसासाठी शिक्षकाची जबाबदारी सांभाळली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या अध्यापनशैलीचे अनुकरण करत वर्गात अध्यापन केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

३४ वर्षांच्या सेवेनंतर सादिक शेख सरांचा सपत्नीक सन्मान
विद्यालयात तब्बल ३४ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सादिक शेख सर यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सादिक शेख यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. भैरवनाथ विद्यालय, हळगाव येथे दोन वर्षे सेवा करताना तेथील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली, अशी आठवण त्यांनी सांगितली.

“खडू-फळ्यापासून माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत बदल स्वीकारा”
शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे म्हणाले, “पूर्वी खडू आणि फळा हे अध्यापनाचे प्रमुख साधन होते. आता माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. उपलब्ध माहितीचा केवळ संग्रह न करता तिचा ज्ञानामध्ये उपयोग करणे गरजेचे आहे. शिक्षकांनीही काळाबरोबर बदलले पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “विद्यार्थी वर्गात न येता केवळ अकॅडमीमध्ये शिकतात, ही एक प्रकारची समस्या आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळा आणि शिक्षकांना पर्याय नाही. ल. ना. होशिंग विद्यालयात विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.”

“ कार्यक्रम जसा दर्जेदार झाला, तसाच अभ्यास करून आपले जीवन आणि करिअरही दर्जेदार करा,” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“१९७५ मध्ये याच शाळेत
मुख्याध्यापकाची भूमिका बजावली”
संचालक डॉ. प्रताप गायकवाड यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “१९७५ साली याच शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून भूमिका बजावली होती.” विद्यालयाशी असलेले जुने नाते आणि शैक्षणिक कार्याचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.

“अकरावी-बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे”
गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अकरावी-बारावी हे आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष असल्याचे सांगितले. “या काळात प्रामाणिकपणे मेहनत करा आणि उज्ज्वल भवितव्य घडवा. सुरुवातीपासून अभ्यासाची सवय लावली तर आयुष्य सिंहासारखे जगता येते; अभ्यासाकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“ राष्ट्रनिर्मितीचे काम शिक्षकच करतात”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बी. ए. पारखे म्हणाले, “समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत आहेत. राष्ट्रनिर्मितीचे काम शिक्षकांच्या माध्यमातून घडते. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देऊन त्यांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनवडे आकांक्षा, अदिती शिंदे आणि विनोद धुमाळ यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

चौकट

विद्यालयातील कला शिक्षक मुकुंद राऊत यांनी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांना अहिल्यादेवी होळकर जन्मस्थानचे पेन ड्राइंग चित्र सप्रेम भेट दिले. मोरे साहेब यांनी अकरावी व बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करावे असे आवाहन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!