सांस्कृतिक स्पर्धेतून समाजाचा एकोपा टिकून – प्रा. मधुकर राळेभात
तीस वर्षांपूर्वी बंद पडलेली जामखेड शहरातील दहीहंडी परंपरा सुरू
जामखेड प्रतिनिधी
तीस वर्षांपूर्वी बंद पडलेली जामखेड शहरातील दहीहंडी परंपरा सुरू करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. यावर्षी मोठा प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढील वर्षी शहरात भव्य दिव्य असे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा सांस्कृतिक स्पर्धेतून समाजाचा एकोपा टिकून राहतो तसेच तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होते. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे प्रतिपादन पुन्हा स्पर्धेचे आयोजक प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी जामखेड शहरातील शनी मारुती मंदिर विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून प्रा. मधुकर (आबा) राळेभात मित्र मंडळाच्या वतीने जामखेड शहरात खंडीत झालेली सार्वजनीक दहीहंडी परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनि-मारुती मंदिर समोर, झालेल्या या उत्सवात मातोश्री लाल आखाडा या गोविंद पथकाने पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडून अकरा हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकास सन्मानपूर्वक अकरा हजार रुपयांचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्वतः प्रा. मधुकर राळेभात, नगरपरिषद बांधकाम समिती सभापती मोहन पवार, शनि – मारुती मंदिराचे विश्वस्त विनायक राऊत, नगरसेवक संजय काशीद आदी मान्यवर असा ग्रामस्थ दहीहंडी फोडण्यासाठी आले गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत, मोहन पवार, संजय काशीद, यांनीही आपल्या मनोगतातून दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. ३० वर्षांपूर्वी बंद पडलेली परंपरा पुन्हा सुरू झाल्याने जामखेड इतरांनी समाधान व्यक्त केले.



