युवकांनी व्यसनमुक्त राहावे ही काळाची गरज : पो. नि. दशरथ चौधरी

जामखेड प्रतिनिधी

भैरवनाथ विद्यालय व जय भवानी कला, क्रीडा व युवक मंडळ, हळगाव (ता. जामखेड) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ तथा व्यसनमुक्ती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेची विद्यार्थिनी कु. आरती बोराटे हिने व्यसनमुक्ती विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “हल्लीचा युवक व्यसनाधीन होत आहे. व्यसन मग दारू, गांजा, चरस किंवा अफीम कशाचेही असो, ते घातकच आहे. युवा पिढी ही देशाची खरी संपत्ती आहे; ती अशी व्यसनाधीन झाल्यास देशाचे मोठे नुकसान होते. सर्वच गोष्टी कायद्याने आटोक्यात आणता येत नाहीत, त्यासाठी समाजप्रबोधनाची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांमधून घडणाऱ्या तरुण पिढीमध्ये मूलभूत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.”

सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दादा झिंजाडे यांनी मार्गदर्शनात सांगितले की, “सध्याची पिढी पालकांपासून आजी-आजोबांपर्यंत मोबाईलच्या आहारी गेली आहे. मोबाईलचा अतिवापर हेसुद्धा एक गंभीर व्यसन बनले आहे. सततच्या स्क्रीन टाईममुळे डोळ्यांचे विकार होत असून मुले व माणसे स्वमग्न होत आहेत. १८ वर्षांखालील मुले मोबाईलवर अयोग्य गोष्टी पाहत असून अभ्यासापासून दुरावत आहेत. गरजेपुरताच मोबाईलचा वापर व्हावा. आता आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या नव्या आव्हानालाही सामोरे जायचे आहे.”

सामाजिक कार्यकर्ते श्री. भाऊसाहेब ज. ढवळे (बी. जे.) यांनी सांगितले की, “समाज दारू, गांजा व चरससारख्या व्यसनांच्या विळख्यात सापडला असून श्रमजीवी वर्ग यात मोठ्या प्रमाणावर अडकला आहे. यामुळे शारीरिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम होत आहेत. लोकांना यकृत, पचनसंस्था व कॅन्सरसारखे आजार होऊन वैद्यकीय खर्च, गुन्हेगारी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.”

रामायणाचार्य ह.भ.प. बाबा महाराज ढवळे यांनी गुटखा व पानमसाल्यामुळे होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सरवर प्रकाश टाकत अध्यात्मिक दाखले देऊन आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी प्राचार्य श्री. आडसूळ सर आणि संस्थेचे संचालक श्री. दीपक होशिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी व मुख्याध्यापकांनी भैरवनाथ विद्यालयातील मुले प्रामाणिक, होतकरू व हुशार असून भविष्यात ती कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख सर व तुटलेले सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here