

कामातील सातत्य व गुणवत्तेमुळे माने यांनी यश संपादन केले:अभियंता किरण साळवे
विठ्ठल माने यांची उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नती; जामखेडमध्ये निरोप व सत्कार समारंभ उत्साहात
जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावत असताना विठ्ठल भोजू माने यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून असंख्य माणसे जोडली. शासकीय सेवेत काम करताना सातत्य, गुणवत्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळेच त्यांनी यश संपादन केले असून, त्यांच्या या कार्याचीच पावती म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता व कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण साळवे यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग श्रीरामपूर येथे उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नती झाल्याबद्दल जामखेड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता विठ्ठल भोजू माने यांचा निरोप व सत्कार समारंभ शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी जामखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंचायत समिती परिसरातून हलगी व ताशांच्या गजरात माने यांची मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या निरोप सोहळ्यामुळे उपस्थितांचे वातावरण भावूक झाले होते.
यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अजय काशिद, बापूराव ढवळे, उपअभियंता किरण साळवे, चव्हाण साहेब, सुनील साळुंके, अनिल पुरी, शशिकांत सुतार, अहिल्यानगर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज (दादा) पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आजबे, सरपंच प्रविण पोते, सरपंच महारूद्र महारनवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक तालुका अध्यक्ष शरद शिंदे, माजी सरपंच बापुसाहेब कार्ले, डॉ. कैलास हजारे, ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे संचालक प्रशांत सातपुते, भाजपा महिला तालुका अध्यक्ष रुपाली गर्जे यांच्यासह कर्जत-जामखेड पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, रोजगार सेवक, संगणक परिचालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना अभियंता किरण साळवे म्हणाले की, “जीवनात आपल्या सोबत कोण येत असते, हे वेळ ठरवत असते; मात्र आपल्या सोबत कोण टिकून राहणार, हे आपल्या व्यवहारातून ठरत असते. आज या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहता माने यांनी आपल्या सेवाकाळात केवळ शासकीय काम केले नाही, तर त्यासोबत मोठ्या प्रमाणात माणसेही कमावली आहेत.” कर्जत-जामखेडसारख्या तालुक्यात शासकीय काम करणे ही तारेवरची कसरत असते. अशा परिस्थितीत माने यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली. कामातील सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी यश मिळवले असून, त्यांची पदोन्नती ही त्यांच्या कार्याची योग्य दखल असल्याचेही साळवे यांनी सांगितले आहे.

सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त उपविभागीय अभियंता विठ्ठल भोजू माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, शासकीय सेवेत काम करताना आपण नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सत्तावीस वर्षांच्या सेवाकाळात अनेक माणसांशी आपुलकीचा धागा जोडला आणि तो कधीही तुटू दिला नाही. “जामखेडकरांनी मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले. त्यामुळेच पंचायत समितीमध्ये सहा वर्षे यशस्वीपणे काम करता आले. पैसा आणि सौंदर्य हे काळानुसार संपते; मात्र माणसाच्या हृदयात निर्माण केलेले स्थान कधीही संपत नाही. शासकीय सेवेत असताना मी प्रामाणिकपणे माणसे जोडण्याचे काम केले आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गर्दीतून त्या नात्याची पावती मिळत आहे,” असे भावनिक उद्गार माने यांनी काढले.

माने यांच्या पदोन्नतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या निरोप व सत्कार समारंभाला अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच त्यांच्याशी विविध माध्यमातून जोडले गेलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगी-ताशांच्या गजरात काढण्यात आलेली मिरवणूक आणि त्यानंतर झालेला सत्कार यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले. शासकीय सेवेत काम करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून विठ्ठल माने यांचा लौकिक असल्याने त्यांच्या पदोन्नतीचा आनंद व्यक्त करतानाच त्यांना निरोप देताना अनेकांच्या भावना दाटून आल्या.
. 



