राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीवरील शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय

महामार्ग, नगरपरिषद,व सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या बैठक संपन्न

जामखेड प्रतिनिधी

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या शासकीय भूखंडांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याचा निर्णय महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगरपरिषद व आंदोलनकर्ते आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

महामार्गाच्या कामामध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमण हा मोठा अडथळा ठरत असल्याने भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीनुसार शासकीय जागा निश्चित झाल्याप्रमाणे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक सहकार्य करणार असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला.

यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्यानंतर काही जणांनी त्या नोटिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्याने उच्च न्यायालयाने संबंधित याचिका निकाली काढत १० पयाचिकाकर्त्यावर प्रत्येकी ₹५० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

जामखेड नगरपरिषद येथे झालेल्या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात, मुस्लिम पंच कमिटीचे अझहरभाई काझी, आंदोलनकर्ते अवधूत पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल उगले, अमित चिंतामणी, नगरसेवक पवन राळेभात, मनोज काका कुलकर्णी, विकी घायतडक, मोहन पवार, प्रवीण होळकर, आश्रू मामा शेळके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीच्या कामाला आता गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर रस्त्याचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.

१)चौकट

“बैठकीत शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुसार हटविण्याचा निर्णय घेण्यात आला, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिक्रमण हटवून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीचे रखडलेले काम सुरू होईपर्यंत संघर्ष कायम राहणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून जनतेला दिलासा द्यावा.”

(आंदोलनकर्ते, अवधूत पवार)

२)चौकट

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांनी रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची जामखेड शहरात पहाणी केली. याबाबत त्यांच्या सोबत बैठक देखील घेण्यात आली. रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी यांच्या बरोबर याबाबत लवकरच बैठक घेऊन महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी ज्योती शिंदे यांनी दिले आहे.

(नगराध्यक्षा, प्रांजल चिंतामणी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here