जवळा येथील जवळेश्वर देवस्थानाला तीन कोटी रुपये निधी मंजूर.

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.

जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजना (ब वर्ग) योजनेंतर्गत भरीव आर्थिक निधी मंजूर केला आहे. त्यानुसार जवळेश्वर देवस्थानाला तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. यासंदर्भात बुधवारी (ता.२९) ग्रामविकास विभागामार्फत शासन निर्णय झाला आहे. श्री जवळेश्वर देवस्थानासाठी प्रसादालय इमारत बांधकाम निधी अंदाजपत्रकीय रक्कम ५ कोटी ८० लाख २६ हजार १७१ रुपये आहे. पैकी तीन कोटी रुपये रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

जवळेश्वर देवस्थान या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा बहाल करण्यात यावा यासाठी, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुसार यापूर्वीच या तीर्थस्थानाला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गाचा दर्जा बहाल करण्यात आला. आता जवळेश्वर देवस्थानाला तीन कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करीत देवस्थान विकास कार्याला प्रारंभ होणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे.

या देवस्थानासाठी भरीव निधी वितरित झाल्याने ,आता भाविकांच्या सुविधेसाठी प्रसादालय इमारत बांधकामास गती मिळणार आहे. राज्य निकष समितीने सहा महिण्यापुर्वी २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या बैठकीत या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून त्यांना मंजुरी दिली होती, त्यानंतर शासन निर्णय होवून आता तीन कोटी रुपये निधीस प्रशासकीय मंजूरी देण्यात आल्याने या भागातील धार्मिक पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

प्रतिक्रिया

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या या विकासवादी भूमिकेमुळे आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे जवळेश्वर तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून, या निर्णयाचे संपूर्ण तालुक्यातून स्वागत होत आहे.

(प्रशांत पाटील, युवक कार्यकर्ते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here