

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्यक – दिलीप तिजोरे
श्री नागेश विद्यालयात भव्य देशी वृक्षारोपण “बिना सहकार नाही उद्धार” चा संदेश
जामखेड प्रतिनिधी
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे असे मत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेडचे अधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप तिजोरे यांनी व्यक्त केले.

सहकार सप्ताहानिमित्त वै विठ्ठलराव ( अण्णा) राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जामखेड येथील श्री नागेश विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार दि १ जुलै रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य तथा श्री संत गोरोबा काका कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरण संवर्धनासह सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप तिजोरे साहेब, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्र कोठारी, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.मधुकर (आबा) राळेभात, नगरसेविका हिना सय्यद, नगरसेवक मोहन पवार, स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले प्रा. शिवाजीराव ढाळे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोर मॅडम, प्रा.ज्ञानदेव कुंभार, सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, डॉ. सागर शिंदे, ॲड. अलताफ शेख, प्रदीप टाफरे, वसीम शेख, अनिकेत पवार , विशाल वनवे, कॅप्टन भोरे मेजर, जितेंद्र बोरा, मुख्तार सय्यद, संतोष बारगजे, आनंद राजगुरू, महेश राऊत, संभाजी मुळे, नासीर चाचू सय्यद, बाबा चंदन, वनरक्षक किसनराव पवार, वनरक्षक सुधाकर घोडके , महादेव डोके, इमरान तांबोळी, अमोल बहिर, अशोक यादव ,योगेश देशमुख, मच्छिंद्र गोरे, संतोष गिरी, अमोल सदाफुले, विकी पिंपळे, रामेश्वर सूर्यवंशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील प्रतिमा पूजन करून प्राचार्य मडके सर यांनी प्रास्ताविकातून वृक्षसंवर्धनाची गरज आणि सहकार चळवळीचे महत्त्व विशद केले. मधुकर (आबा) राळेभात यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळातील दुष्काळाचा संदर्भ देत भविष्यातील पिढीला अशा संकटांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आजपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. युरोपसारख्या थंड प्रदेशातही उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंचा दाखला देत त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.
राजेंद्र कोठारी यांनी पूर्वी रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात असलेल्या वृक्षांची आठवण करून देत सध्या वाढलेल्या वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त केली. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमासाठी विनायक राऊत यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी श्री नागेश विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत कार्यक्रमात सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले, वृक्ष लागवडीसाठी एन सी सी ऑफिसर मयुर भोसले व एन सी सी कॅडेट टीम चे विशेष सहकार्य लाभले. तर उपस्थितांचे आभार विनायक राऊत यांनी मानले. सहकार सप्ताहानिमित्त आयोजित या वृक्षारोपण उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचला.








