जामखेडचे आदर्श शिक्षक व लेखक गोकुळ गायकवाड यांचे निधन

जनमानसाशी घट्ट नाते जोडलेला सामाजिक कार्यकर्ता हरपला.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील आदर्श शिक्षक, संवेदनशील साहित्यिक, सामाजिक व धार्मिक चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व, असंख्य विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आणि समाजमन जपणारे ज्येष्ठ मार्गदर्शक व बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड यांचे पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. निधनाबद्दल गोकुळ गायकवाड यांना विविध मान्यवर व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

त्यांच्या निधनाने केवळ एक शिक्षक नव्हे, तर समाजाला दिशा देणारा विचारवंत, संघर्षातून उभे राहिलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आणि जनमानसाशी घट्ट नाते जोडलेला सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे. त्यांच्या जाण्याने समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गोकुळ गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात मानाचे स्थान प्राप्त केले. शिक्षण, साहित्य, समाजकारण आणि धार्मिक कार्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.

काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या लाडक्या सुपुत्राचे अपघाती निधन झाले होते. त्या असह्य दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही त्यांनी धैर्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला हेही मान्य नव्हते. पुत्रवियोगाची वेदना ताजी असतानाच गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर दुःखाचा आणखी एक मोठा आघात झाला आहे.

गायकवाड यांचे आयुष्य हे संघर्ष, जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा आदर्श होता. त्यांच्या स्मृती, विचार आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतील. भगवान बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना की, दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो आणि दुःखाच्या या कठीण प्रसंगात गायकवाड कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो. त्यांच्या निधनाबद्दल गोकुळ गायकवाड यांना विविध मान्यवर व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here