२०२७ च्या दिवाळीत जामखेडकरांना उजनीचे पिण्याचे पाणी-नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

दहीगाव जामखेड पाणी योजनेची नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष स्थळपहाणी

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहर व उपनगराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उजनी बॅकवॉटर दहीगाव पाणी योजनेची नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष स्थळपहाणी करण्यात आली. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दहीगाव येथे जाऊन कामाची पाहणी केली. सन २०२७ मधिल दिवाळी दरम्यान जामखेडकरांना उजनीचे पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जामखेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्याचे तत्कालीन जलसंधारण मंत्री तथा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याच्या नगरोत्थान अभियानांतर्गत तब्बल २५० कोटी रूपयांची उजनी दहिगाव येथून तब्बल ६५ किलोमीटर अंतरावरून जामखेड शहरासाठी पाणी योजना मंजूर आहे. या योजनेचे बरेचसे काम झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम थांबले होते. मात्र जामखेडचे भूमीपुत्र विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व विषय समित्यांचे सभापती व नगरसेवक यांना विश्वासात व बरोबर घेऊन जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रलंबित कामांना चालना देऊन जामखेडकरांना या योजनांचा लवकरात लवकर लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच अनुषंगाने बुधवार दिनांक १८ मार्च रोजी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या योजनेच्या कामाला गती देण्यासाठी जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार व नगरपरिषदेचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून अडचणी समजावून घेतल्या तसेच यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना सूचनाही दिल्या. तसेच जामखेड नगर परिषदेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी दिले.

जामखेड शहरासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानल्या जाणाऱ्या या योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर असून, एकूण ६६ किलोमीटरपैकी तब्बल ५५ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ किलोमीटर कामात काही शेतकरी, वनविभाग व अन्य तांत्रिक अडचणी येत असून, त्या सोडवण्यासाठी नगरपरिषद पुढाकार घेत आहे. “जामखेडकरांना २०२७ च्या दिवाळीपर्यंत उजनी धरणातून मुबलक व स्वच्छ शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उर्वरित सर्व अडचणी लवकरात लवकर सोडवून ही योजना पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी बोलताना सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, अमितभाऊ चिंतामणी, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीराम डोके, नगरसेवक तात्याराम पोकळे, मनोज कुलकर्णी, संजय काशिद, प्रविण चोरडिया, मोहन वस्ताद पवार, पवनराजे राळेभात, प्रविण सानप, गणेश डोंगरे, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्रविण होळकर, जया गव्हाळे, अशाबाई टकले, नंदाताई होळकर, सिमा कुलकर्णी, संग्राम पोले, मुख्याधिकारी अजय साळवे, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ, प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र चौधरी, अनिल चव्हाण तसेच ठेकेदार इगल इन्फ्राचे अनिल गुरूबक्सानी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here