

मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या तीन विद्यार्थींनीचा ‘स्वामी विवेकानंद अभ्यासिके’त सत्कार!
जामखेड प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रातील तीन गुणवंत विद्यार्थिनींची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अभ्यासिकेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आणि मार्गदर्शन सोहळा आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सोनाली गर्जे, पायल शेख आणि वैष्णवी भोंडवे अशी पोलीस दलात निवड झालेल्या यशस्वी रणरागिणींची नावे आहेत.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर या विद्यार्थिनींनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जामखेड परिसरातून आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिनांक २८ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता ‘स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड’ येथे हा सत्कार समारंभ पार पडला. सत्कारानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात तिन्ही नवनियुक्त महिला पोलीस शिपायांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सोनाली गर्जे हिने शारीरिक चाचणी (ग्राउंड) आणि लेखी परीक्षेचा समतोल कसा साधावा, याचे गणित मांडले. पायल शेख हिने अभ्यासातील सातत्य आणि वेळेचे नियोजन यावर भर दिला. तर वैष्णवी भोंडवे हिने अपयशाने खचून न जाता जिद्दीने कसे उभे राहायचे, याबद्दल स्वतःचे अनुभव सांगितले. तसेच “योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासिकेतील अभ्यासाचे वातावरण यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. ग्रामीण भागातील मुलींनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” अशा भावना सत्काराला उत्तर देताना तिनही विद्यार्थींनीनी व्यक्त केल्या.

या प्रेरणादायी सोहळ्यासाठी जामखेड आणि परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्वामी विवेकानंद अभ्यासिका संचालिका प्रियांका शिंदे यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.









