

चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती उत्सव; मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची रहाणार उपस्थिती
सभापती प्रा.राम शिंदेंचे उपस्थित राहण्याचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती उत्सव यंदा चौंडी येथे सलग तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या भव्य ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पंकजाताई मुंडे, दत्तात्रय भरणे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध मंत्री, खासदार, आमदार आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांनी केले आहे. चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कर्जत-जामखेड तालुक्यातील पत्रकार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती. अहिल्यादेवींच्या जयंतीचे ३०० वे वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत चौंडी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. या एकूण १२०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यापैकी ३६० कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत. तर उर्वरित ६८१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची काही टेंडर्स जलसंपदा विभागाकडून निघाली असून, काही टेंडर्स आचारसंहितेमुळे थांबली होती. आता या सर्व कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले की यंदाचा ३०१ वा जयंती उत्सव तीन दिवस चालणार असून विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मध्ये २९ मे रोजी संध्याकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने चौंडी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि महादीपोत्सव साजरा केला जाईल, ३० मे रोजी संध्याकाळी देशातील प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या नेतृत्वाखाली देशातील व राज्यातील नामवंत कवींचे ‘कवी संमेलन’ रंगणार आहे. यानंतर आकाशात भव्य ‘ड्रोन लेझर शो’द्वारे राजमाता अहिल्यादेवींची भव्य प्रतिमा साकारली जाईल. रात्री १२ वाजता फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून जयंतीचे स्वागत केले जाईल.

दि ३१ मे रोजी म्हणजे जयंतीच्या मुख्य दिवशी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीवर ‘महाअभिषेक सोहळा’ संपन्न होणार आहे. यानंतर मुख्य शासकीय जयंती उत्सव आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा पार पडणार आहे.
या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने आणि भाविकांनी चौंडी येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी केले.









