

जामखेड येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान कडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंद संप्रदाय आणि जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित केले जाते. त्याच प्रमाणे यावर्षीही 04 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान संपूर्ण भारतभर 15 दिवस रक्तदान कॅम्प आयोजित केले आहे.
दक्षिण अहिल्यानगर जिल्हा येथील रामानंद संप्रदाय व जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने रुग्णांची रक्ताची गरज भागविण्यासाठी जामखेड शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसह, तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमोफिलिया थॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर चे पेशंट जास्त प्रमाणात आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत. तुमच्यासाठी ते फक्त रक्तदान आहे मात्र गरजू रुग्णांसाठी ते आहे जीवनदान, त्यामुळेच स्वतःबरोबर आपल्या मित्र व नातेवाईकांना सुद्धा तुम्ही या रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करावे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व रामानंद संप्रदायाच्या वतीने रुग्णांची गरज लक्षात घेऊन हे जीवनदान महाकुंभ- रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. जिल्हाभरात 04 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत विविध ठिकाणी शिबिरे होणार आहेत. रविवार दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सदरचे रक्तदान शिबीर हे ग्रामीण रुग्णालय, नवीन नगरपरिषद शेजारी खर्डा रोड, जामखेड ता. जामखेड जि. दक्षिण अहिल्यानगर यात संकलित करण्यात आलेले रक्त शासकीय रक्तपेढींना देण्यात येणार आहे. यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे, या शिबिरामध्ये नागरिकांनी, तरुणांनी, महिलांनी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

रक्तदानाचे फायदे
१) रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळवून 48 तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरून निघते.
२) रोग प्रतिकार शक्ती वाढते.
३) नियमित तीन ते चार महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब कर्करोग हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते.

चौकट
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान”
मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते समाजात मायक्रोसाईटिक ॲनिमिया, सिकलसेल, थँलेसीमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा गंभीर आजारांशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात अशावेळी तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता आपले फक्त पाच मिनिट आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटांची असली तरी त्या काही थेंबांमुळे.. एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो, एखादे बालक नव्याने श्वास घेते तर एखादा रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येतो असे हे रक्तदान सर्वात सर्वश्रेष्ठ दान आहे.







