रत्नदीपच्या विरोधातील उपोषणाकडे दुर्लक्ष, मनसे व राष्ट्रवादी आक्रमक, 5 जुलै रोजी करणार रास्तारोको
पांडुराजे भोसले यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस
जामखेड प्रतिनिधी
गेल्या सहा दिवसापासून रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विरोधात विद्यार्थींचे स्थलांतर व मेडिकल कॉलेजवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे आमरण उपोषणास बसले आहेत. याच दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील उपोषणस्थळी आंदोलन सुरू केले आहे. मात्र सात दिवस उलटूनही प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्याने जामखेड येथील मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक झाली आसुन दि 5 जुलै रोजी रास्तारोको आंदोलनात करण्याचा इशारा दिला आहे.
या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सात दिवसांपासून रत्नदीप कॉलेजच्या विरोधातील मागण्या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड चे पांडूराजे भोसले यांचे आमरण उपोषण व विद्यार्थींचे आंदोलन सुरू आहे. परंतु अद्याप पर्यंत सदरील मागण्यांविषयी विद्यापीठ किंवा प्रशासनाने उपोषण कर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपोषण स्थगित करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने व उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे.
येत्या दोन दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई करून उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या संदर्भात विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थ्यांच्या स्थलांतराणाविषयी तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा बुधवार दि 5 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता खर्डा चौक याठिकाणी रस्ता रोको करून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष महेश निमोणकर, पै.हवा सरनोबत, सनी सदाफुले, अनिल पाटील, संतोष गव्हाऴे, महेश सोनवणे, गणेश जोशी, पै.बालु साठे मनोज वराट, अक्षय म्हैत्रे, विकी राऊत, युवराज राऊत व पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार व आ. प्रा राम शिंदे या दोन्ही आमदारांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींचे प्रश्न व सध्या पांडुराजे भोसले यांचे सुरू आसलेल्या आमरण उपोषण या विषयाकडे लक्ष वेधले होते. आता प्रशासन व विद्यापीठ विद्यार्थ्यांचा स्थलांतराचा प्रश्न व रत्नदीप मेडिकल कॉलेजवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.