जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (डी) अंतर्गत खर्डा चौक ते बीड कॉर्नर या भागातील अतिक्रमणे हटवून प्रलंबित रस्ता काम पूर्ण करण्यासाठी मंगळवार (दि. २६) सकाळी ९ वाजल्यापासून जामखेड नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी अतिक्रमण हटविताना सर्वांना समान न्याय मिळावा, अशी मागणीही जोर धरत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत होता. विशेषतः बीड कॉर्नर ते खर्डा चौक या भागातील अतिक्रमणांमुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रलंबित रस्ता काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक बैठका घेतल्या होत्या.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान भवनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ३१ मे पूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे हद्दीतील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी जामखेड नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, महावितरण, पोलिस प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

रस्त्यालगत असलेले हातगाडे, दुकानांचे शेड तसेच बेकायदेशीर टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्या.मात्र, अतिक्रमण हटविताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करू नये, सर्वसामान्यांसोबतच धनदांडग्यांवरही समान कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण कायम असल्याने लाईट पोल शिफ्ट करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढील रस्ता काम पुन्हा रखडून रस्ता जैसे थे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानभवनात बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने बीड कॉर्नर ते खर्डा चौक या १२० मीटर अंतरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र वास्तव पाहता समर्थ हॉस्पिटल, बीड रोड ते बीड कॉर्नर या भागातील गटाच्या हद्दी निश्चित झाल्यानुसार तेथील अतिक्रमणांवर कारवाई होणे क्रमप्राप्त होते. तसं न झाल्याने परत एकदा धनदांडग्यांना वाचवून सर्वसामान्यांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.कारवाई होत असेल तर ती सर्वांसाठी समान असावी.नियम गरीबांसाठी वेगळे आणि श्रीमंतांसाठी वेगळे नसावेत.

अवधूत पवार (सामाजिक कार्यकर्ते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here