

जामखेड शहरातील अतिक्रमण व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत अहिल्यानगर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न .
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातुन जाणार्या व रखडलेल्या “राष्ट्रीय महामार्गाचे सर्व काम नियमानुसारच होईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत अतिक्रमण व रखडलेल्या कामांबाबत योग्य निर्णय घेतले जातील,” असे स्पष्ट मत सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केले
जामखेड शहरातील अतिक्रमण तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सभापती मा.राम शिंदे व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी सभापती प्रा.राम शिंदे हे बोलत होते.

अहिल्यानगर येथे मंगळवार दि ५ मे रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत जामखेड शहरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित कामांचा आढावा घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी महामार्गाच्या कामातील दिरंगाई तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल उगले, नगरसेवक संजय काशिद, पवन राळेभात, तात्याराम पोकळे, मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे आदी उपस्थित होते.





