


विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम, जि.प. शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीचे वितरण
जामखेड प्रतिनिधी
शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पक्ष सचिव मा. श्री. राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना मित्र परिवार आणि शिवसेना जामखेड तालुक्याच्या वतीने जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमास प्रारंभ होणार असून, २५ जुलैपासून प्रत्यक्ष वितरणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख मोहन देवकाते यांनी दिली.

जामखेड शहर व तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत अथवा आकस्मिक प्रसंगी तातडीने प्रथमोपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेला प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आकाश बाफना, पायलताई बाफना व त्यांचा मित्र परिवार सामाजिक बांधिलकी जपत शहरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्याच सामाजिक उपक्रमांच्या मालिकेतून प्रथमोपचार पेटी वितरणाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रथमोपचार पेटीचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, शिवकुमार डोंगरे, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, पांडुरंग माने, विकी पिंपळे, दत्तात्रय जगताप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दि. २५ जुलैपासून आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने तसेच तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जामखेड शहर व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम म्हणून त्याचे स्वागत होत आहे.









