

नाहुली विविध कार्यकारी सेवा सोसायटीला जिल्हा बँकेचे सभासत्व; कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा
विधानपरिषद सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाने घेतला निर्णय.
जामखेड प्रतिनिधी
नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची नोंदणी सप्टेंबर २०२२ मध्ये झाल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने संस्थेला सभासदत्व न देता कर्जवाटपापासून वंचित ठेवले होते, परंतु बँकेत संचालक मंडळाची मुदत संपल्या मुळे प्रशासक लागल्या नंतर संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांनी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे प्रशासक यांनी संस्थेला सभासद करून कर्ज वाटप करण्यास मंजुरी दिली.

प्रशासक मंडळाच्या या निर्णयामुळे नाहुली परिसरातील शेतकरी आणि सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सोसायटीला जिल्हा बँकेचे सभासत्व मिळावे आणि कर्ज वाटपाची परवानगी मिळावी यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच संस्थेला ही मंजुरी मिळाली आहे. बँकेकडून कर्ज वाटपाची परवानगी मिळाल्यामुळे आता नाहुली सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यममुदती कर्ज आणि इतर कृषीपूरक योजनांसाठी अत्यंत सुलभतेने अर्थसाहाय्य उपलब्ध होणार आहे.

या महत्त्वपूर्ण यशामुळे नाहुली सोसायटीच्या संचालक मंडळाने व संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन घुमरे यांनी विधानपरिषद सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच सर्व स्तरांतून सोसायटीचे अभिनंदन केले जात आहे. जिल्हा बँकेने दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेच्या माध्यमातून सभासदांना अधिकाधिक पारदर्शक आणि जलद सेवा देण्याचा आमचा मानस आहे, असा विश्वास सोसायटीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
चौकट
लवकरच विधानपरिषद सभापती आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाहुली गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा कार्यक्रम घेऊन चेक वितरण करण्यात येणार आहेत.








