गुटख्याच्या टेम्पोचा सिनेस्टाईल पाठलाग; खर्डा पोलिसांनी ५१ लाखांचा मुद्देमाल पकडला, तिघांवर गुन्हा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिसांनी गुटख्याविरोधात मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह आयशर टेम्पो असा तब्बल ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित आयशर टेम्पोला थांबण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळवून नेल्याने पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून हे वाहन तेलंगशी गावच्या शिवारात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. उज्ज्वलसिंह राजपूत व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका आयशर टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करण्यात येणार आहे. सदर वाहन धाराशिवकडून बीडच्या दिशेने शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जातेगाव फाटा, खर्डा येथे नाकाबंदी केली. त्यावेळी संशयित आयशर टेम्पो भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी वाहन चालकास हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन न थांबविता सुसाट वेगाने बीडच्या दिशेने पळवून नेण्यास सुरुवात केली. संशयित वाहन पळून जात असल्याचे लक्षात येताच खर्डा पोलिसांच्या पथकाने तत्परता दाखवत वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने कारवाई करत सदर आयशर टेम्पो तेलंगशी गावच्या शिवारात ताब्यात घेतला.

त्यानंतर पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपारी आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला. ५१ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी अंदाजे किंमत ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये
आयशर टेम्पो अंदाजे किंमत १० लाख रुपये असा एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजू मेहबूब शेख, रा. भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड; प्रदीप विष्णू गायकवाड, रा. च-हाटा फाटा, ता. जि. बीड; तसेच तुषार नामदेव कुसळकर, रा. बीड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के यांनी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुंमका, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलबुर्गी, तसेच SDPO श्री. सुजीतकुमार धीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उज्ज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, पोलीस हवालदार संभाजी शेंडगे, गोकुळ इंगवले, रावसाहेब नागरगोजे, शशिकांत म्हस्के, वैजनाथ मिसाळ, बाळू खाडे, आनंद धनवडे, विष्णू आवारे, अशोक बडे, राहुल खेडकर, तसेच होमगार्ड तान्हाजी जायभाय, महादेव कदम, राहुल भिसे यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here