जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
दिड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादम जखमी झाला असून याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्ट नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील फीर्यादी आबेद बाबुलाल पठाण रा. गरडाचे पाटोदा हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे रा.जामखेड हा ऊसतोड मजुर म्हणून कामाला होता. मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे, रा. पाटोदा गरडाचे याने मारहाण केली होती. त्यामुळे आरोपी विरोधात दिड वर्षांपुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. याचाच मनात राग धरून दि ३ मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फीर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपीने घटनास्थळाहुन पलायन केले असुन तो सध्या फरार आहे. घटनास्थळी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रांशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असुन लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुढील तपास सपोनि गैतम तायडे हे करत आहेत.
गोळीबारातील आरोपी हा दुहेरी हत्याकांडात होता अल्पवयीन आरोपी
पाटोदा गरडाचे या ठिकाणी मुकादमावर केलेल्या गोळीबारातील आरोपी अक्षय ऊर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे हा पाच वर्षापुर्वी जामखेड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडातील अल्पवयीन आरोपी होता. तो या दुहेरी हत्याकांडातुन निर्देश सुटला होता. मात्र सदर आरोपी हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असुन त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीस त्या कलाकेंद्र चालकाचे आशिर्वाद, कारवाई होणार का ?
पाटोदा गरडाचे या ठिकाणी केलेल्या गोळीबारातील आरोपीस जामखेड येथील एका कलाकेंद्र चालकाचे आशिर्वाद आहेत. सदर आरोपीचा कलाकेंद्र व कलाकेंद्र चालकाच्या सोबत वावर असतो. आरोपी हा गोळीबारानंतर संबंधित कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन तीन जण ताब्यात घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here