दादर स्टेशन येथील रेल रोको अंदोलनात जामखेडचे युवा नेते राहुल उगलेंचा सहभाग
मुंबई : तलाठी परीक्षेतील पेपरफूट आणि भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मंगळवारी दादर स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ खोळंबली होती. या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरील बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिस आणि रेल्वे राखीव दलाने (आरपीएफ)आंदोलकांना हटविल्या नंतर वाहतूक पूर्वपदावर आली. या अंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल उगले, अहमदनगर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संगमनेर शहर अध्यक्ष निखिल पापडेजा, जिल्हा उपाध्यक्ष आनंद सानप, हर्षल राहने या पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक झालेल्या आंदोलनामुळे दादर रेल्वे स्टेशनमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच पुढील ४० ते ५० मिनिटे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. आंदोलकांनी बोरीवलीकडे जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील गाडी अडवली होती. जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्यांची एसआयटी चौकशी होत नाही, तोपर्यंत राज्यात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू राहील, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. विद्यार्थ्यांसाठी हा लढा असल्याचे यांनी सांगितले.
२१० आमदारांचे समर्थन असलेल्या सरकारकडून विद्यार्थ्यांकडे पुराव्यांची मागणी करणे लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारला बदनाम करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे उद्गार महसूलमंत्र्यांनी काढणे अशोभनीय आहे. अश्या प्रकारे सरकार व सरकारचे प्रतिनधी यांच्याबाबत संतप्त वक्तव्य करत सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी अंदोलकाकडून करण्यात आली.