अंगणवाडीची तक्रार केली म्हणून सरपंचास मारहाण, बाजार समितीच्या संचालका सह तीघांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
गावातील अंगणवाडी वेळेवर का उघडली नाही म्हणून सरपंच यांनी अंगणवाडीच्या वरीष्ठ महीला पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार केली. याचा राग आल्याने घोडेगाव येथील व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी सरपंचास मारहाण केली. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे ,शंकर विष्णु भोंडवे व अनिल उर्फ महावीर शिवाजी कडु सर्व रा .घोडेगाव ता. जामखेड या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी दि २९ नोव्हेंबर रोजी गावातील अंगणवाडी क्र. २३ ही सकाळी १० वाजता उघडली नव्हती. या अंगणवाडीची दैनंदिन शासकीय वेळ सकाळी ९ ते २ आशी आहे. त्यामुळे सरपंच शरद जगताप यांनी सरपंच या नात्याने या अंगणवाडीची तक्रारी सोनेगाव च्या बीट पर्यवेक्षिका आढाव मॅडम यांच्या कडे अंगणवाडी वेळेवर उघडत नाही अशी तक्रार केली होती. घोडेगाव येथील या अंगणवाडी क्र.२३ मध्ये जामखेड बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे यांची पत्नी त्रिशाला विष्णु भोंडवे या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तक्रार केल्यामुळे विष्णु भोंडवे यांनी सरपंचास ग्रामपंचायत कार्यालयात येऊन दम देखील दिला होता.
३ जानेवारी २०२४ रोजी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. या नंतर त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मदतनीस महीला व अंगणवाडी सेविका आल्या व त्यांनी सरपंच शरद जगताप यांना सांगितले की संपुर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप सुरू आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतच्या पाठिंब्याचे पत्र द्या असे बोलत होते. या वेळी आरोपी शंकर विष्णु भोंडवे, बाजार समितीचे संचालक, विष्णु शामराव भोंडवे हे त्या ठिकाणी आले व सरपंच शरद जगताप यांना मारहाण केली तर अनिल उर्फ महावीर शिवाजी कडु याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर जखमी झालेले सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप रा. घोडेगाव. ता.जामखेड यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर उपचारातुन बरे झाल्यावर सरपंच शरद जगताप दि ६ जानेवारी २०२४ रोजी खर्डा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींन विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. रईस खलील शेख हे करत आहेत.