

नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घातला; तरुण गंभीर जखमी
अतिदक्षता विभागात उपचार सुरू; जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
इथं मोटारसायकल का लावली, तुम्ही मंदिरात जायचे नाही, असे म्हणत मारहाण करत मंदिरासमोर नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घातल्याने मुकुंद रघुनाथ पोकळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याबाबत शिवाजी मधुकर मोरे (वय ५३, व्यवसाय- वॉशिंग सेंटर, रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १५ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवाजी मोरे व मुकुंद रघुनाथ पोकळे हे दोघे मित्र मुकुंद यांच्या मोटारसायकलवरून जामखेड येथून देवदैठण येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून दर्शन करून दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बटेवाडी शिवारातील खर्डा रोडवरील मारुती मंदिर येथे दर्शनासाठी थांबले. त्यांनी मोटारसायकल मंदिरासमोर लावली व दर्शनासाठी मंदिरात जात असताना तेथे आरोपी बाळू उर्फ दिपक मनोहर खरात, रा. बटेवाडी, ता. जामखेड त्याठिकाणी उभी होती. ती व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर व्यक्तीने, “तुम्ही मोटारसायकल इथे का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही,” असे म्हणत मोटारसायकलची चावी काढून घेतली व मोटारसायकल खाली पाडली. त्यावेळी मोटारसायकलवर बसलेला मुकुंद पोकळे खाली पडला. फिर्यादी त्याला उचलत असताना आरोपीने मंदिराजवळ असलेला नारळ फोडण्याचा दगड मुकुंद पोकळे यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर फिर्यादी शिवाजी मोरे हे मुकुंद पोकळे यांना उचलण्यासाठी गेले असता आरोपीने तोच दगड फिर्यादीच्या डोक्यात मारला तसेच उजव्या खांद्यावर व पायावरही दगडाने मारहाण केली. त्यामुळे त्यांनाही दुखापत होऊन डोक्यातून रक्त येऊ लागले.

यानंतर फिर्यादीने स्वतःचा शर्ट काढून मुकुंद पोकळे यांच्या डोक्यावर बांधला व मोटारसायकल सुरू करून त्यांना घेऊन तेथून निघाले. त्यावेळी आरोपीने, “माझे नाव बाळू आहे. तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले तर तुमचे काही खरे नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या झटापटीदरम्यान मुकुंद पोकळे यांचा मोबाईल हरवला आहे. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांकडून सदर व्यक्तीचे नाव बाळू उर्फ दिपक मनोहर खरात (रा. बटेवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे असल्याचे समजले.

जखमी मुकुंद पोकळे व फिर्यादी शिवाजी मोरे हे मोटारसायकलवरून पवार हॉस्पिटल, जामखेड येथे आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर मुकुंद पोकळे यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून बाळू उर्फ दिपक मनोहर खरात, रा. बटेवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर याच्याविरुद्ध मुकुंद पोकळे व फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खर्डा रोडवरील मारुती मंदिर, बटेवाडी येथे “मोटारसायकल इथे का लावली, तुम्ही मंदिरात जायचे नाही,” असे म्हणत दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे करीत आहेत.








