काल झाडावर चढून आंदोलन केले, आज आत्महत्या; मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

बीड प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बीडमध्ये शनिवारी रात्री एकाने गळफास घेत आत्महत्या केली. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे (44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच काळकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना नागरिकांनी झाडावरून उतरवले होते त्यानंतर 24 तासांतच काळकुटे यांनी राहत्या घरी गळफास घेतला.

नेमकं काय घडलं?

बीड तालुक्यातील ससेवाडी येथील मुळ रहिवासी असलेले जगन्नाथ पांडुरंग काळकुटे हे रिक्षा चालक आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने ते बीड शहरातील गोविंद नगर भागात वास्तव्यास होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते. आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेतही ते सहभागी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री 8 वाजता काळकुटे हे आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढले होते. आरक्षणासाठी झाडावरून उडी टाकून आत्महत्या करु असे त्यांनी म्हटले होते. मात्र, उपस्थित नागरिकांनी त्यांची समजूत काढून त्यांना झाडावरून खाली उतरवले होते.

शनिवारी काळकुटे यांच्या पत्नी अर्चना या गावी शेती कामासाठी गेल्या होत्या. मुले बाहेर होती. सायंकाळी 7 वाजता अर्चना घरी आल्या असता. जगन्नाथ काळकुटे यांनी घरात भगव्या गमजाने छताला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत काळकुटे यांच्या पश्चात आई, पत्नी अर्चना, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटेनची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग

जग्गनाथ पांडुरंग काळकुटे हे कुटुंबासह शेती करत होते. जग्गनाथ काळकुटे यांना निकिता ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणारी मुलगी आणि इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारा सार्थक हा मुलगा आहे. ते बीड शहरातील गोविंदनगर भागात गेल्या काही वर्षांपासून राहतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र?

काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. सुनील कावळे यांनी 18 ऑक्टोबरच्या रात्री BKC येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेतला. त्यातच हिंगोलीच्या जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली शैक्षणिक फी भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. महाविद्यालयात शैक्षणिक शिक्षण घेत असताना घरची हालखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक फीस भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवलं. परमेश्वर चितरे असं या विद्यार्थ्याचं नाव होतं.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिलीये. त्यामुळे आता सरकार यावर कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here