नवर्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यातील गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा आखेर उपचारादरम्यान मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
तीन दिवसांपूर्वीच जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे अज्ञात कारणाने नवर्यानेच आपल्या पत्नी व आईवर कोयत्याने हल्ला केला होता. याघटनेत पत्नी व आई दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .आखेर आज आरोपीची पत्नी उषा रोडे वय ३५ वर्षे,रा .चोभेवाडी हीचा उपचारादरम्यान नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला .
पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की दि ६ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास आरोपी पती रामचंद्र दशरथ रोडे याने यातील फिर्यादी अलकाबाई दशरथ रोडे (वय ६५) व त्यांची सुन उषाताई रामचंद्र रोडे या दोघींना कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे मारहाण केली होती. यानंतर आरोपीने ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादिच्या दोन्ही पायाच्या घोट्यावर व डावे हाताचे कोपरावर, तसेच फिर्यादिची सून हिचे तोंडावर गळ्यावर, डोक्यावर व हातावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करत फिर्यादिला व फिर्यादिची सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
घटनेतील जखमी झालेल्या आरोपीची पत्नी उषाताई रोडे व फिर्यादी अलकाबाई दशरथ रोडे (वय ६५) यांच्यावर नगर येथील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते .आखेर आज दि ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी यातील आरोपीची पत्नी उषाताई रोडे वय ३५ वर्षे हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटना घडली त्या दिवशी आरोपीने सुध्दा स्वतः घराजवळ असणार्या इलेक्ट्रीक डीपीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत आरोपी देखील स्वतः जखमी झाला होता. त्याच्यावर देखील नगर येथील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
पो.ना सरोदे यांनी घेतलेल्या जबाबावरून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आज पत्नीचा मृत्यू झाला असल्याने पोलीस आरोपी विरोधात पुढील कारवाई करणार आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनिल बड़े हे करीत आहेत.