


जामखेड पोलिसांची कारवाई २४ तासांत चोरीचा छडा; दोघे अटकेत, दोघे फरार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपींचा जामखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध घेत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरी गेलेल्या मालापैकी ४ हजार ४७३ रुपयांचा मुद्देमाल तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेपासून ते दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत जामखेड येथील जय हिंद चौक परिसरातील सचिन प्रोव्हिजन स्टोअर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील अंदाजे ४६ हजार ९०० रुपये किमतीचे किराणा साहित्य चोरून नेण्यात आले होते. या घटनेप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जामखेड शहर तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेऊन करण अशोक पवार (वय २० वर्षे) आणि अनिल गौतम काळे (वय २१ वर्षे) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींची गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान चोरी केलेला किराणा माल आरोपी करण पवार याच्या घरातून ४ हजार ४७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटर देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे (फरार) आणि रोहित अशोक काळे (फरार) हे असून ते सर्व मिलिंदनगर, भुतवडा रोड, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अजित मोरे, सफौ शिवाजी कदम, पो.हे.कॉ. संजय लोखंडे, पोलीस कर्मचारी ईश्वर माने, पो.काॅ.गणेश ढोबळे, पो.काॅ.दिपक बोराटे, पो.काॅ.कुलदीप घोळके, पो.काॅ.ज्ञानेश्वर बेल्हेकर, म.पो.कॉ. रत्नमाला हराळे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे.कॉ. संजय लोखंडे करीत आहेत.








