

…म्हणे प्रेमात अडसर, प्रियकराच्या मदतीने मामाच्याच मुलीचा केला गेम; बीड जिल्ह्यातील या ठीकाणी घडली घटना…
बीड, 27 नोव्हेंबर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने विहीरीत ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी गावातील या घटनेने खळबळ उडाली. साक्षी ज्ञानोबा कदम (16)असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण….
कासारी गावात यात्रेसाठी परळी तालुक्यातील पाडोळी येथील वैष्णवी मनोहर काळे ही तिचे मामा ज्ञानोबा कदम यांच्या गावाकडे आली होती. ती मामाच्या गावाला गेल्याचे कळताच तिचा गावातील प्रियकर आकाश नागोराव तांबडे हा स्कॉर्पिओने कासारी गावात आला होता. वैष्णवी ही तिचे मामा ज्ञानोबा सोपान कदम यांच्याकडे यात्रेनंतरही थांबली होती.

साक्षी ही वैष्णवीच्या मामाची मुलगी असून या दोघी जणी सकाळी नवीन कपड्याला शिलाई मारण्यासाठी टेलरकडे जात आहोत असं सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र वैष्णवीने साक्षीला दुपारच्या वेळेस आपल्या शेतात नेलं आणि त्याच ठिकाणी वैष्णवीचा मित्र लखन आणि वैष्णवीने साक्षीला जबरदस्तीने विहिरीत लोटण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने बचावासाठी आरडाओरड केली. यावेळी साक्षीला विहिरीत लोटत असताना तिचे चुलते रमेश आणि आजी जनाबाई यांनी पाहिलं. ते दोघं विहिरीपर्यंत पोहोचेस्तोवर वैष्णवी आणि लखनने साक्षीला पाण्यात लोटून त्या ठिकाणाहून पळ काढला.

या प्रकरणी साक्षीचे काका रमेश कदम यांनी तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत सांगितल्याप्रमाणे वैष्णवी आणि लखन पळून जाणार होते. हे साक्षीनं पाहिलं होतं, ती गावात इतरांना सांगेल यामुळं साक्षीला संपवलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेनं कासारी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघा विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.






