

दोन दिवसांपूर्वी गर्भवती पत्नीचा अपघातात मृत्यू झाला.. विरह सहन न झाल्याने पतीनेही विषप्राशन करून जीवनयात्रा संपवली.. एक कुटुंब संपले..!
पुणे : गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेही विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे घडली. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हळहळला आहे. यामुळे आठ महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या संसाराचा आज करुण अंत झाला आहे. रमेश कानसकर हे आपल्या गर्भवती पत्नीला नारायणगाव येथे दोन तीन दिवसापूर्वी चेकअपसाठी घेऊन गेले होते. रुग्णालयातून परतत असतानाच ट्रॉक्टर ट्रॉली चिरडून पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या पत्नीचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पतीच्या जिव्हारी लागला. यानंतर पतीनेही विषारी औषध घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
विद्या आणि रमेश यांचा आठ महिन्यांपूर्वीच जुन्नर येथे विवाह झाला होता. यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरकडे तपासणी सुरू होती.

गर्भवती पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेले होते
14 नोव्हेंबरला रमेश आपली पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणी करून घरी जात होता. वारुळवाडी येथे येताच ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागला. यामुळे विद्या खाली पडली तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूनंतर पती तणावात होता
पत्नीच्या मृत्यूनंतर रमेश तणावाखाली होता. तसेच त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते. त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वतःला संपवले. आठ महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या संसाराचा अरुंद आणि नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.






