गेवराई प्रतिनिधी

तालुक्यातील निपाणी जवळका येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या यात्रेसाठी कावडीने गोदावरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राजापूर (ता. गेवराई) येथे आज शनिवारी (दि.१६) सकाळी घडली.

मोहन नाना आतकरे (वय १८) व शिवाजी ज्ञानदेव इंगोले (वय १८) दोघे रा. निपाणी जवळका ता.गेवराई असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. निपाणी जवळका याठिकाणी श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येथे भव्य यात्रा भरते. दरम्यान आज सकाळी गावातील तरुण, युवक हे गोदावरी नदीच्या काठी असलेल्या राजापूर याठिकाणी कावडीने पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान त्याठिकाणी हे तरुण गंगेत स्नान करत असताना मोहन नाना आतकरे व शिवाजी ज्ञानदेव इंगोले या दोघांचा नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृत युवकांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने वर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ऐन ज्योतिबा यात्रा उत्सवात निपाणी जवळका ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here