जामखेड (प्रतिनिधी) :- तीर्थक्षेत्र महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भवरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास बुधवार दि. ९ मार्च रोजी सकाळी १० वा. भागवताचार्य ह.भ.प. कांताताई (माईसाहेब) महाराज सोनटक्के यांच्या अमृततुल्य रसाळ वाणीतील श्रीमद् भागवत कथेने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

ज्ञानेश्वर सेवा संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे सलग २२ वे वर्ष आहे. कोरोना महामारी व लॉक डाऊन च्या संकटामुळे गेल्या २ वर्षापासून सार्वजनिक ठिकाणचे सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम बंद होते. मार्च २०२२ पासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत.

बुधवारी पहाटे ५ वा. महादेव मंदिर व विठ्ठल रुख्मिणी मंदिरात काकडा भजन व सकाळी ८ वा. तुळशी पूजा झाली. त्यांनतर भागवताचार्य ह.भ. प. कांताताई (माईसाहेब) महाराज सोनटक्के यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ झाला. श्रीमद् भागवत कथा म्हणजे सर्व ग्रंथांचे सार आहे. जीवनात परमार्थ केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला जर सद्गती प्राप्त करून घायची असेल तर श्रीमद् भगवत कथेचे श्रावण केले पाहिजे. कारण भागवत कथा ऐकल्याशिवाय आपल्या व्यथा दूर होऊ शकत नाहीत असे भागवताचार्य ह.भ. प. कांताताई (माईसाहेब) महाराज सोनटक्के म्हणाल्या.

आजच्या कथेत शुक देव जी महाराज व राजा परिक्षीत यांच्यातील संवाद, भक्तिदेवी व नारदमुनी यांचा संवाद, नारदमुनीचे पूर्व चरित्र असलेली नारद कथा व शुक्राचार्यांच्या जन्माची कथा त्यानी सांगितली. या भागवत कथेस ह. भ. प. मच्छिंद्र महाराज गिरी (सिंथेसायजर), संतोष महाराज सुंबे (ऑक्टोपॅड), कृष्णा महाराज सानप (मृदंग) व रतन ताई महाराज सुतार (टाळ वादन व गायन) यांनी संगीत साथ दिली.

दुपारी ४ वा. ह.भ. प. आजिनाथ महाराज गळगटे (हरी नारायण आष्टा) यांचे प्रवचन, सायंकाळी ६ वा. मृदंग महर्षी केशव महाराज जगदाळे यांच्या श्री संत ज्ञानेश्वर अध्यात्म संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हरिपाठ व रात्री ९ वा. बाल किर्तनकार ह.भ. प. कुमारी वैष्णवी दिदी सोनटक्के व ह. भ. प. ज्ञानेश्वरी दिदी सोनटक्के यांचे चक्री किर्तन झाले. या कार्यक्रमास भवरवाडी पंचक्रोशितील भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळी :- भवरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात श्रीमद् भागवत कथा सांगताना भागवताचार्य ह.भ.प. कांताताई (माईसाहेब) महाराज सोनटक्के व इतर सहकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here