गिस्सा डाव अन् महारुद्र चितपट! पै. रविराज चव्हाण ठरले मानाच्या पहिल्या कुस्तीचे मानकरी

जामखेड प्रतिनिधी

नागपंचमी यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही सलग २४व्या वर्षी कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा प्रतिष्ठानच्या वतीने अजयदादा काशीद मित्र परिवाराच्या आयोजनातून जामखेड महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य-दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले. या कुस्ती मैदानात राज्यासह परराज्यातील नामवंत मल्लांनी सहभाग घेत एकापेक्षा एक रोमहर्षक कुस्त्यांचे प्रदर्शन केले. या कुस्ती मैदानाचे प्रमुख आकर्षण ठरली ती पहिली मानाची कुस्ती. आंतरराष्ट्रीय आखाडा, पुणे येथील पै. रविराज चव्हाण आणि कुर्डुवाडी येथील महारुद्र कळेज यांच्यात झालेली ही कुस्ती अत्यंत चुरशीची झाली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या लढतीत रविराज चव्हाणने आपल्या कौशल्याचा प्रत्यय देत गिस्सा डावावर महारुद्रवर मात केली आणि मानाची पहिली कुस्ती जिंकण्याचा मान मिळवला. ही कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या कुस्तीशौकीनांनी मोठा जल्लोष केला.

दुसऱ्या कुस्तीत पै. मोईन पटेल आणि मुसा पहेलवान यांच्यात सामना झाला. यामध्ये मुसा पहेलवान विजयी ठरला. तिसऱ्या कुस्तीत रोहित दैय्या आणि शाहरुख खान आमनेसामने आले. या लढतीत शाहरुख खानने बाजी मारली. यासह दिवसभर अनेक रोमहर्षक कुस्त्यांनी जामखेडकरांचे लक्ष वेधून घेतले.

राम शिंदेंचा कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय टोला

या कुस्ती मैदानात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मागील वर्षी अर्धवट राहिलेल्या कुस्तीचा संदर्भ देत राजकीय टोला लगावला. मागील वर्षी अर्धवट राहिलेली कुस्ती पुढील वर्षी पुन्हा त्यांना बोलावून एकदा ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊ द्या आणि मग कोण कुणाला पाणी पाजतो, हे जामखेडच्या जनतेला कळू द्या, असे म्हणत त्यांनी राजकीय दंड थोपटल्याची चर्चा मैदानात रंगली.

परराज्यातील मल्लांचीही उपस्थिती

यंदाच्या आखाड्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक नामवंत मल्लांनी उपस्थिती लावली. पूर्वनियोजित पद्धतीने लावण्यात आलेल्या कुस्त्यांमुळे कुस्तीप्रेमींना एकापेक्षा एक दर्जेदार लढती पाहायला मिळाल्या. मल्लांनी आपल्या ताकदीसोबतच डावपेच आणि कौशल्याचे दर्शन घडविले.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

कुस्ती मैदानाला विविध राजकीय नेते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांच्या सत्कारासाठी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. अजयदादा काशीद मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा उपक्रम राबविला जातो. यंदा गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल साळुंके सर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

युवराज भाऊ काशीद ठरले मिरवणुकीचे आकर्षण

कुस्ती मैदान सुरू होण्यापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ‘मराठा गौरव’ युवराज भाऊ काशीद यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने जामखेडकरांचे लक्ष वेधून घेतले.

नागपंचमी यात्रा जामखेडची राज्यभर वेगळी ओळख निर्माण करणारी आहे. त्यातच अजयदादा काशीद यांच्या माध्यमातून गेल्या २४ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानामुळे जामखेडच्या कुस्ती परंपरेला राज्यभर नावलौकिक मिळत आहे. यंदाच्या आखाड्यातील दर्जेदार कुस्त्यांमुळे कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here