


जामखेड येथील दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ६२ आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर राज्य शासनाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. या कारागृहातील ६२ आरोपींना बुधवारी (दि. ९ जुलै) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. यापुढे जामखेड येथील न्यायालयीन कोठडीतील कैद्यांचा मुक्काम नाशिक मध्यवर्ती कारागृहातच होणार आहे.

राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच जीर्ण अवस्थेतील कारागृहांचा विचार करून महाराष्ट्रातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कारागृहांची इमारत जीर्ण झाल्याने तसेच कैदी पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कारागृहांतील सर्व कैद्यांना जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याच निर्णयाची अंमलबजावणी करत जामखेड येथील दुय्यम कारागृहातील एकूण ६२ आरोपींना ९ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलिस वाहनांच्या ताफ्यातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. या आरोपींमध्ये ५९ पुरुष आणि ३ महिला आरोपींचा समावेश होता.

स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जामखेड कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. आरोपींना नाशिककडे रवाना करताना त्यांच्या नातेवाईकांनी कारागृहाबाहेर उपस्थित राहून निरोप दिला. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले.
या स्थलांतर प्रक्रियेदरम्यान सर्व प्रशासकीय व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्य शासनाच्या धोरणानुसार दुय्यम कारागृहांचे कामकाज टप्प्याटप्प्याने बंद करून कैद्यांचे स्थलांतर मोठ्या व अधिक सुरक्षित कारागृहांमध्ये करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामखेड येथील दुय्यम कारागृहाचे कामकाज कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून, यापुढे येथील न्यायालयीन कोठडीतील सर्व आरोपींना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येणार आहे.


