नवकार मंत्र आयोजनाने एकता व प्रेरणेला नवे बळ | नवसंकल्पांतून नव्या पिढीस नवी दिशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे पार पडलेल्या नवकार मंत्र आयोजनाने समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जामखेड शहरातील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहात दि 9 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 वाजता “विश्व नवकार महामंत्र दिन” ऑनलाईन कार्यक्रम जैन श्रावक संघ, जामखेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवकार मंत्राच्या उच्चारणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले आणि सहभागी प्रत्येकाच्या मनामध्ये शांती, समाधान व समृद्धीची ऊर्जा संचारली. या आयोजनाचा मुख्य उद्देश समाजामध्ये एकता, संस्कार आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करणे हा होता. “नवकार मंत्र ही केवळ प्रार्थना नसून, ती प्रेरणेचा स्रोत आहे,” असे मत जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे यांनी सांगितले.
यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, सचिव शरद शिंगवी, रमेश गुगळे, आनंद गुगळे, संदीप बोगावत, संतोष फिरोदिया, मंगेश बेदमुथ्था, निखिल बोथरा, संजय गांधी, जितेंद्र बोरा, पिंटूशेठ बोरा, अशोक बाफना, सुयोग पितळे, अमोल तातेड, प्रफुल्ल सोळंकीसह आदी श्रावक, श्राविकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी भाजपा जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, सामाजिक कार्यकर्ते मुख्तार सय्यद, नगरसेवक अमित चिंतामणी, विवेक कुलकर्णी, कॅप्टन लक्ष्मण भोरे, शहराध्यक्ष पवन राळेभात, महेश काथवटे आदी विविध धर्माचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रभावना संदीप बोगावत व विनायक राऊत यांनी वाटप केले.
चौकट
जैन धर्मगुरु परमपूज्य बुध्दीसागर महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वीच सांगितले होते की, भविष्यकाळात किराणा दुकानांमध्ये पाणी विकले जाईल. त्यांच्या या भविष्यवाणीकडे आजच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर, ती एक धोक्याची घंटा ठरते.
समाज प्रबोधनासाठी नऊ संकल्प
1. पाणी वाचवा – भविष्यासाठी थेंबथेंब साठवा.
2. वृक्षारोपण – पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत.
3. स्वच्छता मोहीम – समाजात स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवावी.
4. वोकल टू लोकल –स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवावा व इतरांना प्रेरित करावे.
5. देशदर्शन – आपला देश, त्याची संस्कृती व वैविध्य याचा गौरव करावा.
6. नैसर्गिक जीवनशैली – रासायनिक घटकांपासून पृथ्वीचे संरक्षण करावे.
7. निरोगी जीवनशैली – संतुलित आहार व व्यायामाचा अंगीकार करावा.
8. योग व खेळ – दररोजच्या जीवनाचा भाग बनवावा.
9. गरीबांसाठी मदतीचा संकल्प – समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात द्यावा.
जैन परंपरेनुसार, “तप व संयमाने जीवन समृद्ध होते” – ही शिकवण या संकल्पांच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल. समाजात एकात्मतेचा संदेश देणारे हे आयोजन अनेकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा व मार्गदर्शन ठरले.