
शाळेला तीन शिक्षक द्या! अन्यथा मुलांची शाळा पंचायत समिती कार्यालयात भरवणार – ॲड. डॉ. अरुण जाधव
प्रतिनिधी जामखेड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे तातडीने तीन शिक्षक नियुक्त करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मुलांची शाळा भरवण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव व तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत किमान तीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग भरवले जातात या शाळेत पाच शिक्षकांची नेमणूक आहे. पण सध्या मात्र फक्त दोनच शिक्षक इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सांभाळतात यामुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होऊ लागलेला आहे.
या शाळेत निवारा बालगृहातील बहुतांश मुले व मुली शिकतात शाळेचा दर्जा खालावत चालल्याने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटणार आहे. ज्या मुलांना कोणी नाही अनाथ निराधार आहेत अशा मुलांचा संस्था लोक मदतीतून सांभाळ करते त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते कारण हे मुले स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचे करिअर करतील पण दर्जाहीन शिक्षणामुळे या मुलांची अधोगती होण्यास उशीर लागणार नाही तेव्हा आणखीन तीन शिक्षकाची विनाविलंब मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेमणूक करावी या मुलाचे भविष्य सावरावे.
मोहा हे गाव जामखेड तालुक्यातील शेवटचे गाव आहे डोंगराळ भागामध्ये आहे या परिसरातील बरेच लोक ऊस तोडीला वीटभट्टीच्या कामासाठी उपजीविका करण्यासाठी स्थलांतरित होत असतात यामुळे मोहा परिसरातील लोक आपले मुलं आई आजोबांकडे ठेवून बाहेर गावाला कामासाठी जात असतात परंतु या शाळेच्या जवळच निवारा बालगृह नावाचे वस्तीगृह चालू आहे. त्या बालगृहातील जवळपास 75 मुले मुली शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे जात आहेत हे सर्व मुले मुली गोरगरीब कष्टकरी अनाथ निराधार आदिवासी भटके विमुक्त परिवारातील आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा गावातील आणि वस्तीगृहातील पट एकूण 127 मुलं मुली शिक्षण घेत आहेत परंतु या मुलांचा पट पाहता त्या ठिकाणी फक्त दोन शिक्षक आहेत सर्व शिक्षण अभियान अंतर्गत कायद्याने एकूण पाच शिक्षक असणे गरजेचे आहे. शिक्षक कमी असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे 127 मुलांना दोन शिक्षकांना शिकवणे सांभाळणे त्यांना ज्ञान देणे अशक्य झाले आहे. त्याठिकाणी फक्त दोनच शिक्षक काम करीत आहेत.













