मिनी अग्नीशमन हे सुरक्षतेचे कवच म्हणून काम करेल – नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या हस्ते वाहानाचे उद्घाटन

जामखेड शहर : पुढारी वृत्तसेवा

शहराच्या प्रगती बरोबरच शहराची सुरक्षा देखील महत्वाची आहे. शहरातील अरुंद रस्ते व अडचणीच्या ठिकाणी नवीन आलेल्या मिनी अग्नीशमन रेस्क्यू वाहानाची मदत होणार आहे. सुरक्षतेचे कवच म्हणुन मिनी अग्नीशमन वहान काम करणार आहे असे मत नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या हस्ते नगर परिषदेत नव्याने दाखल झालेल्या अग्निशमन मिनी फायर रेस्क्यू वाहानाचे उद्घाटन बुधवार दि २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी फीत कापुन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, मुख्याधिकारी अजय साळवे, गटनेते तात्याराम पोकळे, अमित चिंतामणी, सभापती श्रीराम डोके, मोहन पवार, अर्जुन म्हेत्रे, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर, प्रविण सानप, अशोक शेळके व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी म्हणाल्या की महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे मिनी फायर अग्निशमन वाहानाची मागणी केली होती. त्यांनी संबधित विभागाला सांगुन जामखेड नगरपरिषदेस हे मिनी फायर अग्नीशमन रेस्क्यू वाहन उपलब्ध करून दिले. त्याबद्दल देखील नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व नगरसेविकांसह सभापती प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले.

यानंतर मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की शहराचा वाढता विस्तार व अरुंद रस्ते यासाठी मिनी अग्नीशमन रेस्क्यू वाहानाची आवश्यकता होती. या वाहनाच्या माध्यमातून फोम व पाण्याच्या सहाय्याने आग विझवता येते. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात ही व्हॉन दाखल झाली आहे. विषेश म्हणजे अरुंद रस्त्याबरोबरच हे मिनी अग्निशमन वहान हे आपत्कालीन परिस्थितीत घरांची पडझड कींवा पुर परीस्थितीत देखील लोकांना वाचवण्यासाठी मदत करणार आहे. यावेळी नगरसेवक ॲड. प्रविण सानप यांनी सांगितले की सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सहकार्याने व नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या प्रयत्नांनी हे मिनी अग्नीशमन रेस्क्यू वाहन जामखेड नगरपरिषदेस उपलब्ध झाले आहे. याचा शहरातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल असे सांगून कार्यक्रमाचे आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here