डॉ भास्कर मोरे यास न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी
जामखेड प्रतिनिधी
विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ. भास्कर मोरे यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता आज दि १४ रोजी न्यायाधीश वैभव जोशी यांनी आरोपीस एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचे विरोधात मंगळवार दि ५ मार्च पासून कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर दि ७ मार्च रोजी विद्यार्थींच्या मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. या आंदोलनास संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, केदार रसाळ, रमेश आजबे, रासपचे प्रदेश प्रवक्ते रविंद्र कोठारी, विकास मासाळ, मुस्लिम समाज बांधव, वकील संघ, राष्ट्रवादी ,भाजप, भीमसैनिक, यांच्या सह जामखेड ग्रामस्थ व धारकरी यांनी पाठिंबा दिला आहे.
डॉ. भास्कर मोरे यास अटक होण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यात आला होता. डॉ. मोरे याच्या विरोधात दि ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून जामखेड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वैभव जोशी यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. उद्या एक दिवसाची पोलिस कोठडी संपल्या नंतर वनविभागाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबधि वन विभागाचे अधिकारी मोहन शेळके यांच्या वतीने न्यायालया समोर मोरे यांना वन विभागाच्या ताब्यात घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की मोरे याच्या विरोधात दहा ते बारा तक्रारी अर्ज आले आहेत. त्याप्रमाणे मुलिंनी न घाबरता गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे. तसेच मोरे याच्या रील्हॉलवर परवाना रद्द करण्या संबंधात जिल्हा अधिकारी यांच्या कडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अशी माहिती दिली आहे.
डॉ. भास्कर मोरे याला पोलिसांनी अटक केली असली तरी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषणास सुरुच आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. परंतु जो पर्यंत विद्यार्थींचा ब्रिज कोर्स, परीक्षा, नोडल अधिकारी नियुक्त करणे, यासंबधित चर्चा करण्यासाठी चार विद्यापीठाच्या नोडल अधिकार्‍यांनी समक्ष यावे व या सर्व प्रश्नांसंबधात संबंधित चार विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी लेखी द्यावे तो पर्यंत उपोषण सुरूच रहाणार आसल्याचे पांडुराजे भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here