

जामखेड शहरातील अतिक्रमण प्रकरणाची सुनावणी उद्या; नागरिकांचे लक्ष उच्च न्यायालयाकडे.
जामखेड (प्रतिनिधी)
शहरातील अतिक्रमण प्रकरण पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले असून उद्या दि. ५ मे २०२६ रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार यांनी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण व कामाच्या अनियमिततेबाबत आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगर परिषदेने दि. ११ फेब्रुवारी व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेत पाडकामाविरोधात स्थगिती मिळवली. न्यायालयाने दि. २४ मार्च २०२६ पर्यंत पाडकामास स्थगिती देत संबंधित विभागाला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, २४ मार्च रोजीची सुनावणी पुढे ढकलण्यात येऊन ती दि. ५ मे २०२६ रोजी निश्चित करण्यात आली होती.

दरम्यान, उद्याच्या सुनावणीत अतिक्रमण हटवण्याबाबत स्पष्ट आदेश येणार की, अपीलकर्ते पुन्हा कायदेशीर पळवाट काढत पुढील तारीख घेणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे शहरातील विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणात सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जामखेडकरांच्या वतीने आपले म्हणणे पुराव्यानिशी उच्च न्यायालयात सादर केल्याचे समजते. त्यामुळे यावेळी न्यायालयाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









