अन्यथा मंत्र्याच्या घरासमोर चुली पेटवणार- ॲड अरुण जाधव

गॅस टंचाई विरोधात चुल पेटवुन करण्यात आले आंदोलन

जामखेड शहर प्रतिनिधी

देशभरात गॅस सिलेंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली आहे. सध्या गोरगरीब असलेल्या कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. त्यामुळे सरकारने हा गॅसचा काळाबाजार करणार्‍या दलालांनवर कठोर कारवाई करावी. तसेच गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर पुढील आंदोलन मंत्र्याच्या घरासमोर चुली पेटवुन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी दिला आहे.

देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर आंदोलन” सोमवार ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव व नगरसेविका संगिता भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महागाई व गॅस टंचाई विरोधात तहसील कार्यालयासमोर चुल पेटवुन व घोषणा देत सरकारचा निषेध करित आंदोलन करण्यात आले.

पुढे बोलताना ॲड. अरुण जाधव म्हणाले की सध्या गॅस टंचाईच्या नावाखाली नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत. ९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलेंडर सध्या जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला आहे. आणि हाच सिलेंडर जादा दराने काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. या गंभीर व ज्वलंत प्रश्नाची तातडीने दखल घेऊन जनतेला न्याय द्यावा अन्यथा पुढील आंदोलन हे मंत्र्याच्या घरासमोर चुली पेटवुन पुढ़ील आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे ॲड अरुण जाधव यांनी दिला आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका संगिता भालेराव, प्रवक्ते बापुसाहेब ओहोळ, विशाल गव्हाळे, प्रा. सुनील जावळे, भिमराव चव्हाण, अनिल सदाफुले, हुसेन मदारी, मच्छिंद्र जाधव, संदिप आखाडे, रामचंद्र भालेराव, रजनी औटी, ललीता पवार, सुरेखा सदाफुले, अरुणा सदाफुले, कुसुम साळवे, मनिषाताई जाधव, रोहीणी काळे तसेच संतोष चव्हाण, ऋषिकेश गायकवाड व अरविंद जाधव सह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१) चौकट

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक स्वरूपात चूल पेटविण्यात आली. यातून गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या घरातील विझलेल्या चुलींचे वास्तव प्रशासनासमोर मांडण्यात आले. आंदोलनात महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here