मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी जामखेड शहरात विशेष कॅम्पचे आयोजन

आधारकार्ड, ओळखपत्र व फोटोसह केंद्रावर हजर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जामखेड शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादी अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मतदार नोंदणीची खातरजमा करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) तसेच दोन सहकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारांची नवीन नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, नाव वगळणे तसेच इतर आवश्यक बदलांची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने नागरिकांना आपल्या मतदार यादीतील नावाची तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. मतदान केंद्रावर येताना आधारकार्ड, ओळखपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे सोबत असल्यास अर्जाची प्रक्रिया जलद आणि सुलभ होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

यावेळी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की, “मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची खातरजमा करून आवश्यक असल्यास नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे अथवा इतर बदल तातडीने करून घ्यावेत. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.”

तसेच जामखेडचे तहसीलदार धनंजय बांगर यांनी सांगितले की, “भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जून ते २९ जुलै या कालावधीत विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. बीएलओ व कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करून मतदार यादी अचूक करण्याच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.”

दरम्यान, प्रशासनाच्या या आवाहनाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिकांची चांगली गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते नागरिकांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच विविध फॉर्मची माहिती देण्यासाठी मदत करत आहेत.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नवीन मतदारांनी नोंदणी करून घ्यावी, नाव किंवा पत्त्यातील चुका दुरुस्त करून घ्याव्यात तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याची खात्री करावी. या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले मतदानाचे हक्क अबाधित ठेवावेत, असे आवाहन तहसीलदार धनंजय बांगर आणि मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here