अहमदनगर : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके निवडून आले. तर सुजय विखे पराभूत झाले. यानंतर मात्र आता राजकारण तापले असून समर्थक आमने-सामने येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी निलेश लंके समर्थक पीए राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आला यामुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव करत नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके निवडून आले.
निवडणुकीनंतर आता गावागावात गटागटातील राजकारण पेटले असून कोणी कोणाला लीड दिला कोणी कोणाचा कार्यक्रम केला याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आपल्या चारचाकी वाहनातून जाणाऱ्या झावरे यांच्यावर पारनेर बस स्थानकाजवळ दहा ते बारा जणांकडून हल्ला करण्यात आला असून यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. झावरे यांना मारहाण करण्यात आली असून सुदैवाने झावरे यांना जास्त इजा झाली नाही. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या प्रकारामुळे लंके समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून घटनेची माहिती मिळताच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती मिळते. हल्ला का झाला, कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान या प्रकारामुळे पारनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या झावरे यांच्यावर विखे समर्थकांनी हल्ला केल्याचे बोलले जात आहे.