रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेवर गुन्हा दाखल
विद्यार्थी व उपोषणकर्ते उपोषणावर ठाम; विद्यापीठाचे कुलगुरू येत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरूच रहाणार
जामखेड प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी डॉ भास्कर मोरे याच्यावर कारवाई व्हावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. याच अनुषंगाने आखेर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींनीने मोठ्या हिमतीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉ भास्कर मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत विद्यार्थींनीने दिलेल्या फीर्यादीत म्हंटले आहे की डॉ भास्कर मोरे यांनी पिडीत मुलीस कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलवून घेतले. तसेच ऑफिस च्या ॲंटी चेंबर मध्ये तिच्याशी अश्लील चाळे केले व विनयभंग केला या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर च्या अध्यक्षानेच कॉलेज मधिल विद्यार्थींनी वर केलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी व जामखेड मधिल विविध संघटनानकडुन या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे ,पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या तपास करीत आहेत.
या पुर्वीही दाखल झाला होता विनयभंगाचा गुन्हा
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर चे संस्थापक अध्यक्ष याच्या विरोधात मागिल वर्षी देखील कॉलेज मधिल मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात शेकडो विध्यार्थींचे आंदोलन सुरू आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले व संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे देखील विद्यार्थींसमवेत उपोषणास बसले आहेत. उपोषण स्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पक्ष जामखेड तालुका वकील संघ यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रशासनाकडु आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारीसाठी महीला सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी यांची नियुक्ती केली होती. मात्र तरी देखील विद्यार्थी डॉ भास्कर मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते आखेर रात्री उशिरा डॉक्टर भास्कर मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जो पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील कुलगुरू उपोषणस्थळी येत नाहीत तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा ठाम निश्चय घेतल्याने सदरचे विद्यार्थींचे आंदोलन व उपोषण सुरूच राहीले आहे.